अयोध्येतील राममंदिर न्यासचे अध्यक्षपद रा. स्व सरसंघचालकांकडे असू नये : विहींप

VHP

नागपूर : अयोध्या येथील राममंदिराच्या निर्मितीसाठी सरकारकडून स्थापन होणा-या न्यासाचे अध्यक्षपद राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकाकडे असू नये, अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेने शनिवारी नागपुरात मांडली. वक्फ बोर्डाला मशिदीसाठी दिली जाणारी जागा अयोध्येच्या पूर्वीच्या सीमेबाहेर देण्यात यावी आणि राममंदिराच्या निर्मितासाठी यापूर्वी निश्चित असलेले मॉडेल कायम रहावे, अशी भूमिकाही विहींपने मांडली आहे.

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याकडे प्रस्तावित रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्षपद सोपविण्यात यावे, अशी मागणी काही संतांनी केली आहे. याकडे लक्ष वेधले असता अध्यक्षपद सरसंघचालक भागवत यांच्याकडे असू नये, असे विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष चंपत राय यांनी स्पष्ट मत व्यक्त केले. संघाचा स्वयंसेवक या नात्याने ही आपली स्पष्ट भूमिका असल्याचे राय यावेळी म्हणाले.

सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी पाच एकर जागा देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमी प्रकरणी दिलेल्या निवाड्यात सरकारला दिले आहेत. ती पाच एकर जागा बोर्डाला अयोध्या नगर पालिकेच्या जुन्या सीमेबाहेरच देण्यात यावी, अशी आमची मागणी असून त्यामुळे भविष्यातही सौहार्दाचे वातावरण कायम राहील असा आमचा यामागील विचार असल्याचे राय यांनी सांगितले.

देशभरात कोट्यवधी लोकांच्या घरांमध्ये तीस वर्षांपूर्वी तयार केले गेलेले प्रस्तावित रामजन्मभूमी मंदिराचे मानचित्र असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे मंदिराच्या निर्मितीसाठी तेच कायम ठेवण्यात यावे, मंदिराच्या निर्मितीसाठी कोरिव काम करून तयार करण्यात आलेल्या दगडांचाच वापर व्हावा, अशी आमची मागणी असल्याचे राय यांनी सांगितले.