
दिल्ली कॕपिटल्सकडून खेळताना गेल्या वर्षी आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी बजावलेला अष्टपैलू अक्षर पटेल (Axar Patel) हा भारताचा 302 वा कसोटीपटू ठरला आहे. या 27 वर्षीय डावखुरा गोलंदाज कम फलंदाजाला भारताने इंग्लंडविरुध्दच्या (India vs England) चेन्नई (Chennai) कसोटीसाठी संघात स्थान दिले आहे आणि कर्णधार विराट कोहलीने त्याला टेस्ट कॕप दिली आहे.
या निमित्ताने भारतासाठी खेळलेल्या पटेल आडनावाच्या क्रिकेटपटूंची चर्चा सुरु झाली आहे आणि त्यात भारतीय क्रिकेटप्रेमींना पटकन आठवणारी नावे म्हणजे ब्रिजेश पटेल (Brijesh Patel) , जसू पटेल, रशिद पटेल, पार्थिव पटेल, मुनाफ पटेल आणि अक्षर पटेल. यापैकी शेवटचे जे तीन पटेल आहेत, पार्थिव, मुनाफ व अक्षर या तिघांनी इंग्लंडविरुध्दच पदार्पण साजरे केले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अशा ‘पटेल’ आडनावाच्या खेळाडूंचा शोध घेतला तर असे 61 खेळाडू आढळून येतात.
भारतासाठी यात वर उल्लेख केलेल्या प्रमुख खेळाडूंशिवाय वन डे इंटरनॅशनल खेळलेले अशोक पटेल, महिला कसोटीपटू ज्योत्स्ना पटेल, महिला वन डे इंटरनॅशनल खेळलेली रिटा पटेल हे सुध्दा पटेल आडनावाचे खेळाडू आहेत. आणखी 9 पटेल आडनावाचे खेळाडू भारताच्या युवा संघात (19 वर्षाआतील) खेळलेले आहेत.
विशेष म्हणजे ‘पटेल’ आडनावाचे खेळाडू भारतासाठीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाहीत तर इंग्लंड, न्यूझीलंडसाठीही कसोटी सामने खेळले आहेत. त्यात पटकन आठवणारी नावे म्हणजे न्यूझीलंडचा दीपक पटेल, एजाज पटेल व जीतन पटेल, इंग्लंडचा समीत पटेल व मीन पटेल ही नावे आहेत.
याशिवाय सिनियर संघातर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले जे इतर खेळाडू आहेत त्यात पनामाचे परीश भारत पटेल, दीपककुमार पटेल, मितुलकुमार पटेल, पार्थ पटेल, चिलीचा हिरेनकुमार पटेल, मयंक पटेल, मेक्सिकोचा कांतीलाल पटेल, मलावीचा हमझा पटेल, आदिल पटेल, मोहम्मद पटेल, कॕनडाचा आशिश पटेल, केन पटेल, केनियाचा ब्रिजल पटेल, कल्पेश पटेल, मल्हार पटेल, रुषभ पटेल, राकेप पटेल, कॕनडाचा हिरल पटेल, जितेंद्र पटेल, मोनाली पटेल, अमेरिकेचा मोनांक पटेल, तिमील पटेल, निसर्ग पटेल, बल्गेरियाचा मोहन पटेल यांचा समावेश आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला