“जाणीव कृतज्ञतेची !”

जाणीव कृतज्ञतेची - मनसंवाद

कालच्या लेखामध्ये आपण कोरोना ने काय शिकवले या विषयी बोललो. मान्य आहे, परिस्थिती खूप चिघळली आहे ,कुठून कुठून आणि कसं कसं सावरायचं ?आभाळच फाटले तर ठिगळ कुठे लावायचं? पण आपल्या दृष्टिकोनात काही बदल केले तर लक्षात येतं की संकटही आपल्याला खूप शिकवून जातात. जसं कोरोना (Corona) ने ही आपल्याला भरपूर शिकवले. बरेचदा तर आपल्याला वाटते ते ,संकट नसतच तर तो असतो केवळ आभास ! त्याने आपण दुःखी चिंतित होतो.

एका शेतकऱ्याच्या शेतात साप आणि उंदीर दोन्ही असतात .पण त्याला त्याची कल्पना नसते. नेहमीप्रमाणे एका रात्री शेतातून जात असताना साप त्याच्या पायाला दंश करतो. पण खाली पाहिल्यावर त्याला पळून जाणारा उंदीर दिसतो .शेतकऱ्याला वाटतं की आपल्याला उंदीर चावला. त्यामुळे त्यावर काही उपचार करत नाही .सुदैवाने बहुतेक सापाप्रमाणे हा सापही बिनविषारी असतो. म्हणूनच त्याचा त्या शेतकऱ्यावर काहीही परिणाम होत नाही. शेतकरी आपल्या रोजच्या कामांमध्ये गुंतून जातो. काही महिन्यानंतर पुन्हा एकदा रात्री शेतातून जाताना अचानक त्याला उंदीर चावतो. पण यावेळी खाली पाहताच त्याची नजर सापावर पडते. साप उंदराची शिकार करण्यासाठी त्याचा पाठलाग करत असतो. सापाला बघताक्षणी शेतकऱ्याला घेरी येते .आणि तो खाली कोसळतो. त्याच्यावर बरेच उपचार केले जातात. पण काहीही उपयोग होत नाही .कारण आजार वेगळाच असतो आणि उपचार वेगळ्याच रोगावर केले जातात. हळूहळू शेतकऱ्याचा आजार मानसिक झालेला असतो. थोडक्यात काय, तर आपल्या आयुष्यातील बहुतांश चिंता या प्रत्यक्ष संकटापेक्षा त्याच्या भ्रमामुळे, त्याकडे बघण्याचा दृष्टिकोनामुळे उद्भवतात ,म्हणूनच कुठल्याही संकटाकडे नीट बघितलं पाहिजे .सगळ्या दृष्टीने त्याचा विचार केला पाहिजे.

मनुष्य संकटांना घाबरतो. परंतु संकटातून संधी शोधण्याची कला फारच थोड्या कडे असते. रिचर्ड बाख यांनी म्हटलंय कि “जिच्या हाती तुमच्यासाठी बक्षीस नाही ,अशी एकही समस्या नाही”. म्हणूनच प्रत्येक समस्ये बाबत खरंतर कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे! पण परत आडवा येतो तो त्या समस्येकडे बघण्याचा दृष्टीकोन ! कुठलीही गोष्ट आपण नव्याने करायला सुरुवात करतो ,एखादे कौशल्य मिळवायला बघतो, नवा व्यवसाय सुरू करतो तेव्हा या नव्या गोष्टींशी” युज टू” होईपर्यंत नव्या कामाने, नव्या परिस्थितीत गोंधळल्यासारखं होतं. म्हणून मी ती गोष्ट सोडून द्यायची का? किंवा मला अपयशी समजायचं का ?नाही! फक्त मी त्या गोष्टीसाठी अजून पुरेशी तयार झालेली/ झालेली नाही .त्याच्यासाठी मला वेळ आणि कष्ट द्यावे लागणार आहेत ,आणि योग्य वेळ येण्याची वाटही पहावी लागणार आहे.

आपल्या मनातली भीती ही कुठलीही प्रगती करत असताना, प्रगतीतील अडथळा बनू शकते. बरेचदा आपण एखादी गोष्ट जेव्हा पार पाडतो ,तेव्हा लक्षात येतं की अरेच्या !ही तर माझ्यात अंगभूतच कला आहे. पण म्हणतात ना तुझं आहे तुझपाशी! आपल्यापाशीच असणाऱ्या गुणांची आपल्याला जाणीव नसते. ती होण्यासाठीच किंबहुना हे अनुभव, हे अडथळे ,ही संकटं आपल्यावर येत असतात. या प्रत्येकातील संधी पकडायला हवी. आणि मुख्य म्हणजे त्या प्रत्येक अनुभवांना थँक्यू म्हणायला हव, एवढेच काय अडथळाबद्दल सुद्धा कृतज्ञता व्यक्त करायला हवी .

एकदा एक माणूस परीस शोधायला निघतो .त्यासाठी रस्त्यात त्याला जो दगड दिसेल तो उचलायचा आणि गळ्यातल्या साखळीला लावायचा, परीस नाही असे लक्षात आले की फेकून द्यायचा. असा त्याचा दिनक्रम झाला होता .असे बरेच दिवस गेले ,महिने गेले ,वर्षे संपली पण त्याच्या दिनक्रमात काही बदल झाला नाही. दगड घ्यायचा साखळीला लावायचा आणि मग तो फेकून द्यायचा!…. शेवटी तो माणूस म्हातारा झाला… आणि ज्या क्षणी तो शेवटचा श्वास मोजत होता .त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या गळ्यातील साखळीकडे जातं, ती साखळी सोन्याची झालेली असते. दगड घ्यायचा साखळीला लावायचा, आणि फेकून द्यायचा या नादामध्ये त्याचं साखळीकडे लक्षच केलेलं नव्हतं!

फ्रेंड्स ! आपल्या प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी परीस येतोच. वेगवेगळ्या रुपात! कधी आई वडिलांच्या रूपाने तर कधी भाऊ-बहिणीच्या नात्याने तर कधी मित्र-मैत्रिणींच्या नात्याने… तर कधी प्रियकर किंवा प्रेयसीच्या प्रेमाने… अगदी जोडीदाराच्या रुपात सुद्धा! कोणत्या ना कोणत्या रूपात “तो “आपल्याला भेटत असतो. आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत असतो.. आपण जे काय असतो किंवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतोच!..पण आपण आपल्या आजूबाजूच्या असणारे किंवा आपल्याला घडवणारे परीस गृहीत धरतो आणि मग त्या म्हाताऱ्या माणसासारखा होत आपलं… गळ्यातली साखळी कधी सोन्याची झाली ते कळतही नाही.

मात्र असेही काही लोक असतात, आज माझ्याकडे एका आजोबांचा फोन आला होता. माझा एका पेपर मधला लेख आवडला, म्हणून सांगण्यासाठी त्यांनी आवर्जून फोन केला. बोलताना कळलं की ते एका पेट्रोल पंपावर काम करतात. लेख आवडल्याचे तर त्यांनी सांगितलं, पण ते सांगत होते की आज तुमचा लेख मी वाचू शकलो, समजू शकलो ते माझ्या आईमुळे! मी तिचे अकरावें अपत्य. ते आजोबाच स्वतः आज 65 च्या पुढे आहे. ते म्हणाले ,माझी आई अशिक्षित होती. तिला वेळ नसायचा. पण तरीही ती मला पुस्तक दाखवत, त्या चित्रावरून बाराखडी शिकवायची .आणि मी ती चित्र पाहूनच उत्तर द्यायचो. अशामुळेच मी वाचू लागलो .अजूनही माझी वाचनाची आवड आहे, आज जे काही मला ज्ञान मिळतं, ते आईनी केलेल्या मेहनतीमुळे आणि संस्कारांमुळे! अशाप्रकारे त्यांनी व्यक्त केलेली ती कृतज्ञता मला खूप आवडली.

आपल्या संस्कृतीमध्ये सकाळी उठल्याबरोबर जमिनीवर पाय टेकवण्या पूर्वी,” समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले,विष्णु पत्नी नमस्तुभ्यं पाद स्पर्श क्षमस्व मे ! “असं म्हणून या धरणी मातेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते,” कराग्रे वसते लक्ष्मी”यासारख्या श्लोकातून कष्ट करणारे आपले हात, किंवा कष्टकरी आणि बुद्धीजिवी घडवणाऱ्या आता बद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते.

आपली निसर्ग साखळी जी आहे, ती पर्यावरणाचे रक्षण करते. ती अशीच परस्परांवर अवलंबून आहे, त्यामुळे त्यातील प्रत्येक घटकात बद्दल कृतज्ञता व्यक्त करायलाच हवी. आपले आपले बरेच सणसमारंभ आहे सुद्धा त्या त्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे असतात उदा. पोळा, नागपंचमी.

याशिवाय वरच्या गोष्टीत म्हटल्याप्रमाणे एकदा तरी आपल्या जीवनात, परिस बनून आलेल्या असंख्य व्यक्ती ,संस्था ,वेगवेगळी ठिकाणं ,आपलं घर, आपल्या घरातली आपल्या अभ्यासाची जागा आणि इतर बरच काही त्यातून आपला आयुष्य घडलं. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हेच जीवन आहे.

मी तर म्हणेन, जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीचा प्रचंड राग येतो, त्यावेळी या व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करा , तिला माफ करा ,तिला जे जे चांगलं आहे जगातल ते सगळं मिळू दे !अशी प्रार्थना करा. असं दृश्य डोळ्यासमोर उभ करा.! त्यामुळेच आपल्या मनातील वैराची भावना निघून जाईल. स्वतःचा त्रास कमी होईल. आणि पुढे चालून तीच व्यक्ती तुमच्याशी चांगली ही वागायला लागेल.

कारण आतापर्यंत तिच्यामुळे आपण खूप संघर्ष केला आणि त्या संघर्षाने आपल्याला खूप खूप गोष्टी शिकवल्या.

एकदा एक छोटी मुलगी तिच्या बाबांना लिहिते,”बाबा तुम्हाला वाटतं ,मी तुमच्या कडे बघत नाहीय,पण तुम्ही जेव्हा मी काढलेलं चित्र फ्रिज वर लावलं,तेव्हा मी दुसर चित्र काढायला पळाले, मी बघत असते, जेव्हा तुम्ही देवासमोर हात जोडून उभी असतात. मग मला समजतं देव असतो आणि मी त्याच्याशी मला हवं तेव्हा बोलू शकते त्याच्यावर विश्वास ठेवू शकते .तुम्हाला वाटतं पण मी बघत असते, आजारी मित्राच्या घरी त्याची सेवा सुश्रुषा करायला जातात .तेव्हा सगळ्यांनी एकमेकांची काळजी घेतली पाहिजे हे मी न सांगताही शिकते. तुम्हाला वाटतं मी तुमच्याकडे बघत नाहीये ,पण आजवर मी जे काय बघितलं, जे बघत असताना मी बघते आहे हे तुम्हाला माहित नव्हतं ,जे काही शिकले ,तुमच्याकडून त्याबद्दल खूप खूप धन्यवाद!

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

ही बातमी पण वाचा : “करोनाने हरवले ? नव्हे शिकवले !”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER