फरार सुशीलकुमारवर दिल्ली पोलिसांनी जाहीर केले एक लाखाचे बक्षीस

Maharashtra Today

युवा पहिलवानाच्या हत्येप्रकरणी फरार असलेला आॕलिम्पिक पदक विजेता मल्ल सुशील कुमार (Sushilkumar) याचा ठावठिकाणा देणाऱ्यास एक लाखाचे बक्षिस देण्याचे दिल्ली पोलिसांनी जाहीर केले आहे. सुशीलकुमारचा साथीदार अजय कुमार (Ajay Kumar) याच्यावरही 50 हजाराचे बक्षीस दिल्ली पोलिसांनी (Delhi Police).जाहिर केले आहे.

सुशीलकुमार विरोधात अजिमानपात्र वाॕरंट बजावण्यात आला आहे. ताज्या घडामोडीत सुशीलकुमार शरण येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून त्याच्या अटकपूर्व जामिनाच्या याचिकेवर दिल्लीतील रोहिणी न्यायालयात मंगळवारी सुनावणी होणार आहे.

दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये (Chhatrasal Stadium) 4 मे रोजी झालेल्या मारहाणीच्या घटनेत सागर धनखड (Sagar Dhankad) या युवा पहिलवानाचा मृत्यू झाला होता. या घटनेत आपला काही संबंध नसल्याचा दावा करणारा सुशीलकुमार नंतर मात्र बेपत्ता झाला आहे आणि पाच राज्यांत पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणात सुशीलसह सहा जणांविरुध्द अजामिनपात्र वाॕरंट बजावण्यात आले आहे.

माॕडेल टाऊन भागातील एक फ्लॕट खाली करण्यावरुन छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगमध्ये हा मारहाणीचा प्रकार घडला होता आणि त्यावेळी सुशीलकूमार तेथे उपस्थित होता असा आरोप आहे. सागर धनखडला जबरदस्तीने तिकडे ओढून आणत मारहाण करण्यात आली होती.

दरम्यान, या प्रकरणात अडचणी वाढत असल्याने सुशीलकुमार लवकरच दिल्ली-एनसीआर भागातील न्यायालयात शरण येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सुशीलकुमारच्या वतीने व्हाटस अॕप काॕलद्वारे माॕडेल टाऊन पोलिसांना असे कळविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सुशील व त्याच्या साथीदारांना शोधण्यासाठी पोलीस ठिकठिकाणी छापे मारत आहेत. शिवाय सुशीलचे सासरे व नामांकित कुस्ती प्रशिक्षक सत्पाल आणि त्याच्या परिवाराची वारंवार चौकशी करण्यात येत आहे. सुशीलकुमार हा नजफगड- बहादुरगड- झज्जर या भागात लपलेला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.

या प्रकरणात प्रिन्स दलाल नावाचा एक पहिलवान अटकेत आहे. मारहाणीच्या घटनेनंतर छत्रसाल स्टेडीयममधून बाहेर पडायचा मार्ग त्याला मिळाला नव्हता म्हणून तो पोलिसांना गवसला. मारहाणीच्या वेळी सागर धनखडचा एक साथीदार गोंधळाचा फायदा घेऊन घटनास्थळाहून पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. त्याने पोलिसांना या घटनेची खबर केली होती. आणि पोलिस येण्याची चाहुल लागताच सुशील व त्याचे साथीदार फरार झाले होते. प्रिन्सला रस्ता न उमजल्याने तो मारेकऱ्यांच्या एका कारमध्ये लपून बसला होता. स्टेडीयममधील कार तपासताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते.

या प्रकरणात सुशीलकुमारवर भादंविच्या कलम 302 व 308 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button