वादविवाद टाळा ,सुख संवाद साधा….!

Avoid arguments, have a happy conversation ....!

हाय फ्रेंड्स ! कालच आपण श्री समर्थ रामदास स्वामी (Ramdas Swami) यांचे मनाचे श्लोक आणि मानसशास्त्र किती जवळचे आहे हे बघत होतो. केवढा मोठा मानसशास्त्र हा विषय ,किती कमी श्लोकांमध्ये त्यांनी सामावलं आहे, हे बघून खूप आश्चर्य वाटलं. फ्रेंड्स !जेवढा माणसाचा स्वतःचा स्वतःशी संवाद म्हणजेच मनसंवाद महत्त्वाचा, तेवढाच इतरांशी संवाद हा ही तितकाच महत्त्वाचा असतो. कारण परस्परांशी होणाऱ्या संवादावर आपापसातले नातेसंबंध, कामाच्या ठिकाणचे , सहकाऱ्यांबरोबरचे नाते अवलंबून असते.

जेणेकरून आपल्या कार्यालयीन जीवनावर ,वैयक्तिक जीवनावर आणि त्याचबरोबर सामाजिक जीवनावरही परिणाम होत असतो. परस्परांबद्दलचा संवाद हा सुसंवाद व्हायला हवा हे मानसशास्त्र नेहमी सांगत आले आहे. पण मनाच्या श्लोकांमध्ये देखील श्लोक क्रमांक ६१ ते ६३ आणि इतरही अनेक श्लोकांमध्ये वादविवादाला थारा न देता सुखसंवाद कसा साधला जायला हवा. यावरच भर दिला गेलेला आहे.

कलह म्हणजे कलियुग की काय ? असं म्हणावसं वाटतं .कारण कलह हे कलियुगाचे वैशिष्ट्य आहे. अगदी साध्या साध्या गोष्टींवरुन माणसे वाद घालत राहतात. सर्वसामान्य माणसांची गोष्ट नाही तर अक्षरश: राजकारण्यांपर्यंत सर्वत्रच वाद विवादांना पीक आलेले देिसते. त्यात भर घालतात ते वृत्तपत्रे आणि दूरदर्शन ही प्रसारमाध्यमे! बरेचदा छोट्या-छोट्या वादग्रस्त मुद्द्यांना अतिशय भयंकर असे परस्परविरोधी मतांच्या माणसांनी भडकावलेले दिसते. आणि त्याला तिखट-मीठ लावून प्रसार माध्यम त्यात खत पाणी घालतात. अनेक रिकामटेकडी माणसे असली भांडण पहात राहतात आणि मग त्यातून निष्पन्न काही होत नाही .तर केवळ कोळसा उगाळावा तेवढा काळाच अशी निरर्थक चर्चा तेथे होत राहते .पुन्हा त्यात साधते ते काहीच नाही. उलट बरेचदा डोंगर पोखरून उंदीर निघाल्यासारखी गत होते. केवळ प्रसारमाध्यमांना अर्थप्राप्ती होते एवढेच.

समर्थांनी मनाच्या श्लोकात साधकाला असे वादविवाद टाळायला सांगितलेली आहे. त्याऐवजी सुखसंवाद हा भावात्मक आणि रचनात्मक शब्द समर्थ वापरतात. साधुसंत कधीही वाद घालीत नाहीत .ते सुखसंवाद किंवा चर्चा करतात .त्यांच्या चर्चेतून सामाजिक सुसंवाद निर्माण होतो. बरेचदा पुढारी मंडळी किंवा मोठे साहित्यिक कुठल्याही विषयावर वाद निर्माण करतात. मुळात तो फार मोठा वादाचा विषय नसतोच .देशापुढे एवढ्या गंभीर समस्या असताना छोट्या छोट्या विषयावर लोक आपला वेळ मजेत घालवतात या सगळ्या पार्श्वभूमीवर समर्थांचे श्लोक खरोखरच मार्गदर्शक ठरतात .बरेचदा तर समाज माध्यमांवरील या चर्चा मला अक्षरशः नळावरील भांडण सारख्या वाटतात.

समर्थ रामदास स्वामी म्हणतात कि “उभा कल्पवृक्षा तरी दुःख आहे l तया अंतरी सर्वदा तेची आहे l जनी सज्जनी वाद हा वाढवावा l पुढे मागुता शोक जिवी धरावा” ll ६१ ll माणूस जसे विचार करेल तसाच होतो. वास्तू देवता “तथास्तु “म्हणत असते. एका अर्थाने आपण सारेजण कल्पवृक्षाखाली उभे आहोत. आपण सुखाचे चिंतन केल्यास आपल्या वाट्याला सुख येईल आणि रडत असल्यास आपण दुःखी होऊ, अलीकडे नकारात्मक विचारसरणी खूप वाढते आहे .कल्पवृक्षाखाली उभ्या असलेल्या माणसाने दुःखाचे चिंतन करावे ,याचे समर्थांना वाईट वाटते यावरूनच आपणच आपल्या दुःखाला जबाबदार आहोत हे लक्षात येते. मनाच्या श्लोकात समर्थ सज्जन हा शब्द संत या अर्थाने वापरतात काही लोक संतांकडे जाऊनही वाद घालत असतात. वाद घालून आपण आपले दुःख वाढवितो आणि माणसं तोडतो त्यामुळे परिणामी आपल्याला दुःख होते.”उदंड वोळखी होता, उदंड भाग्य होतसे l उदंड कळहो होता l उदंड लाथा खातसे ll”

सुसंवादाला मानसशास्त्रामध्येही अतिशय महत्त्व आहे. “ट्रांजेक्शनल अनालीसिस “ही एक थेरपी सुसंवादासाठी अतिशय योगदान ठरते. त्याच प्रमाणे “लॉ ऑफ अट्रॅक्शन” मानसशास्त्र सिद्धांत हेच सांगतो की ज्याप्रमाणे वास्तु तथास्तु म्हणते किंवा कल्पवृक्षाखाली उभे राहिल्यास जे मनात येईल ते मिळतं तुम्ही कल्पवृक्षाखाली उभी राहून दुःख जर मागितलं तर जसे दुःख प्राप्त होते, तसेच मानसशास्त्रही ते सांगते की तुम्ही जर सतत मी नकारात्मक विचारात गुंग झालात तर नकारात्मक ?गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होती.

एक गोष्ट आहे, एके ठिकाणी भगवान बुद्धांची प्रवचने बरेच दिवस चालली होती तिथे सगळ्या प्रकारची लोक जमत होती. संत संगती चा महिमा भगवान वारंवार सांगत असत. एक माणूस मात्र बाहेर आल्यावर निरर्थक बडबड आणि चेष्टा करीत असे. त्यांनी श्रद्धाळु माणसाला विचारले,” काय रे मन: शांती तर सोडून दे, पण तुझे भगवान सोने मिळवून देऊ शकते काय ? “त्यावर त्या मित्राने उत्तर दिले ,कि “भगवान हे काय सोने मागण्यासाठी कारण आहे का? तुला त्याची किंमत कळत नाही. पण इच्छा हे तर बघ मागून. “दुसऱ्या दिवशी भगवान एकटे असताना तो अश्रद्ध माणूस त्यांच्याकडे जाऊन म्हणाला की ,”माझी तुमच्यावर श्रद्धा आहे .संत काहीही देऊ शकतात तर मला भरपूर सोने मिळू शकेल काय ?” एवढ्यात भगवान ओरडले ,”अरे ते बघ ! अजगर . पकड ना तुला सोने हवे आहे ना ? पकड लवकर. “पण त्या माणसाची काही हिम्मत झाली नाही. शेवटी अजस्त्र प्राणी अंग चोरून एका बिळात शिरला आणि इंच भर शेपटी तेवढी बाहेर राहिली. तेवढी त्या माणसाने पकडली कारण आता धोका नाही हे त्याला कळले होते. पण तेवढीच सोन्याची झाली.

भगवंताची परीक्षा घेणाऱ्या त्या माणसाच्या पदरी विफल त्याचे आणि नैराश्याचे दुःख पडले. त्याला स्वतःचाच राग आला. याचाच अर्थ सत्संगती लाभून सुद्धा केवळ वाईट विचारांमुळे माणसाचे अतोनात नुकसान होते. मतभेत ,वितंडवाद ,अशांतता आणि दुःख हे सगळे केवळ मन नीट नसल्याचे लक्षण आहेत. लोकांमध्ये लोकांसारखे होऊन मिसळून जायचे असेल तर तारतम्य आवश्यक असतं.

ते दोन प्रकारे साध्य होतं लोकांच्या मनासारखं वागल्याने .आपण सर्वांमध्ये चटकन विसरून जाऊ शकतो हे खरं. पण त्यांना आपल् स्थान दुय्यम. तिय्यम झालेले आपल्याला स्वीकारावे लागते. आपली मतं ,आपल्या इच्छा ,बाजूला ठेवावे लागतात. त्यामुळे होणारे दुःख आपल्याला भोगावे लागतं .याउलट लोकांना विरोध केल्याने आपण एकटे पडणं ,लोकप्रियता कमी होणं, कामावर लोकांनी आपल्याला त्रास देण,आपली अडवणूक करणे अशा गोष्टी घडू शकतात. या दोन्ही प्रकारातून उद्भवणारा त्रास, दुःख ,तोटे टाळण्यासाठी या दोन्हीमध्ये संतुलन राखावं. कोणत्याही प्रसंगात लोकांना न दुखवता आपल्याबाबत कटुता निर्माण न करता विरोध दर्शवण्याचा कौशल्य आत्मसात करावे. आणि निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यासाठी लोक काय बोलतात? कसं बोलतात? आपले मुद्दे कसे मांडतात ?इतरांच्या मुद्द्यांना विरोध कसा करतात ?त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया कशा असतात?

माझा भांडण लोकांना कितपत पटत? इतर जण विरोध कसा करतात? आपले मतभेद कसे कुठे होतात ?संघर्ष कुठे नेमके उद्भवतात ?आपल्या मताला आपण किती मुरड घालू शकतो? आपल्या मनाला मुरड घातली आणि नाही घातल्याने काय तोटे होणार ?किती दुःख होणार? याचा विचार करायला हवा. इतरांच्या म्हणण्याला आपला विरोध असेल तर तो स्पष्टपणे नोंदवायला हवा.

आपले मत दुसऱ्याला पटवताना स्वतःच्या मतावर ठाम राहून पण दुसऱ्याला न दुखवता, अतिशय नम्रपणे विचार मांडण याला मानसशास्त्रमध्ये ,”असरटिवेनेस “assertiveness असे म्हणतात. याचा वापर कशा पद्धतीने करता येतो? आणि श्री समर्थांनी अशा अशा पद्धतीने सुसंवाद साधण्यासाठी आपल्या मनो बोधामध्ये काय सांगितले आहे. याविषयीचाही शोध घ्यायला हवा.

संत वाद घालीत नाहीत किंवा वाद वाढवीत नाहीत. ते मोजके आणि हिताचे बोलतात .त्यांचे संभाषण ऐकल्यावर माणसाच्या वागण्यात बदल होतो. तसेच माणसे भक्तिमार्गाला लागतात. पण विद्वानांच्या भाषणामध्ये मात्र फक्त भाषेचा फुलोरा असतो ,ती तात्पुरती करमणूक असते त्यातून समाज परिवर्तन घडणार नसते .मग अशा या बाष्कळ चर्चेला अर्थच नाही. श्री समर्थ हे सुद्धा सुसंवादाची अनेक सूत्र आपल्याला सांगतात, आपल्यासमोर मांडतात. किती मौल्यवान गोष्टी खूप पूर्वी पासून आपले भारतीय साहित्य सांगते ,ह्यामुळे अभिमान वाटतो.

मानसी गिरीश फडके
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER