आई सांगायची राजकारणात जाऊ नको – आदित्य ठाकरे

अवधूत म्हणाले आपकी बात ‘पटनी’ चाहीए, आदित्य म्हणाले, तुमची ‘दिशा’ चुकली!

Aditya Thackeray-Rashmi Thackeray

“आई सांगायची राजकारणात जाऊ नको.  बाबा आहेत, आजोबा आहेत, पेपरात चांगलं येतं, वाईट येतं, हाऊसमध्ये जाण्याची हौस माझीच होती. आजोबा हे वेगळं व्यक्तिमत्त्व होतं. विचारांची पेरणी केली.  नव्या महाराष्ट्रात यशस्वी
झालं. मागे कुणी तरी महाराष्ट्राचे चार तुकडे होऊ शकतात असं म्हटलं. आधी सामाजिक फाळणी; पण शिवसेनेत जात, धर्म आणि विभाग कधीही पाहिला जात नव्हता.

महाराष्ट्राचं भविष्य घडवायचं आहे म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत.” असे आदित्य ठाकरे म्हणाले. संगमनेरच्या अमृतवाहिनी महाविद्यालयात ‘संवाद तरुणाईशी’ या कार्यक्रमात राज्यातील सहा तरुण आमदारांनी संवाद साधला. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, रोहित पवार, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दिकी या आमदारांची मुलाखत गायक, संगीतकार अवधूत गुप्ते  यांनी घेतली.

यावेळी अवधूत गुप्ते यांनी सर्व युवा आमदारांना राजकीय प्रश्नांसोबतच वैयक्तिक प्रश्नही विचारून धमाल उडवून दिली. अवधूत गुप्ते यांनी आदित्य ठाकरे यांना शपथविधीवेळी आईचं नाव घेण्यामागचं कारण विचारलं. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, “मी शपथविधीवेळी आईचं नाव घेतलं ते नैसर्गिक आणि सहजपणे. आई-वडील दोघांनी आपल्याला मोठं केलेलं असतं. आई आपल्याला आजही ओरडा करते, ते प्रेमानं असतं. आई आपली काळजी घेते, म्हणून मी आईचं नाव घेतलं.”

अवधूत म्हणाले, आपकी बात ‘पटनी’ चाहीए, आदित्य म्हणाले, तुमची ‘दिशा’ चुकली-

आई मुलाची जबाबदारी तो मोठा होईपर्यंत घेते, नंतर ती जबाबदारी दुसऱ्या कुणाकडे देते. रश्मी वहिनींनी किती वर्षं तुमची जबाबदारी घ्यायची? असा प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारण्यात आला. यावर आदित्य यांनी दिलेले उत्तर ऐकून एकच जल्लोष झाला. आदित्य ठाकरे म्हणाले, “आता आमदार म्हणून माझी जबाबदारी आईने मुख्यमंत्र्यांकडे सोपवली आहे.” त्यावर अवधूत गुप्तेंनी पुन्हा विचारलं, “आम्हाला मधे मधे बातम्या येत असतात, आप कुछ भी बोलो,

हमे आपकी बात ‘पटनी’ चाहीए. आपका उत्तर पटानी चाहीए.” यावर आदित्य ठाकरे यांनी, “तुमची ‘दिशा’ चुकलेली आहे.” असं म्हणताच एकच जल्लोष झाला.