
सिनेमा इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्यांची जितकी क्रेझ असते तितकंच गायकांचंही वलय असल्याचे आपण नेहमी बघतो. अशाच पंक्तीमध्ये संगीतकार आणि गायक अशी दुहेरी भूमिका बजावणारा अवधूत गुप्ते हा नवं काय घेऊन येणार याकडे त्याच्या चाहत्यांचेच नव्हे तर समस्त प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलेलं असतं. मुळातच अवधूत (Avadhut) हा वेगळच रसायन असलेला अवलिया माणूस आहे. त्याचं संगीत आणि त्याचा आवाज या दोन्ही गोष्टींवर फिदा असलेल्या चाहत्यांची संख्या वाढतच आहे. अवधूत आता लवकरच त्याच्या चाहत्यांसाठी एक रॅप सॉंग घेऊन येणार आहे. ही बातमी कळताच मराठी संगीताच्या विश्वात उत्सुकतेचे वातावरण तयार झाले आहे. त्याचं प्रत्येक गाणं हे थिरकायला लावणारं असतं शिवाय वेगवेगळे प्रयोगही त्यामध्ये केलेले असतात. त्यामुळे त्याच पठडीतलं पण रॅप साँग फ्लेवर ऐकण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.
महत्त्वाचं म्हणजे आजपर्यंत अवधूत गुप्ते याने अनेक वेगवेगळ्या प्रकारचे संगीत सिनेमासाठी तयार केले आहे. शिवाय वेगवेगळ्या म्युझिक अल्बमच्या माध्यमातूनही त्याने गाण्यांचे फ्लेवर्स त्याच्या प्रेक्षकांना ट्रीट म्हणून दिले आहेत. पण रॅप सॉंग हा प्रकार अवधुत त्याच्या संगीतकार होण्याच्या प्रवासात पहिल्यांदाच गाणार आहे. यापूर्वीची त्याने केलेली अनेक गाणी उडत्या चालीची तसेच थिरकायला लावणारी आहेत. हा प्रकार तो पहिल्यांदाच त्याच्या प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहे. या रॅपसाँगचे वैशिष्ट्य म्हणजे या गाण्याच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश देखील दिला जाणार आहे.
गायक, संगीत दिग्दर्शक, दिग्दर्शक, निर्माता, परीक्षक अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून अवधूत गुप्ते नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येतो. त्याच्या रॉक सॉंग, प्रेमगीत, कव्वाली या जल्लोषमय गाण्यांनी प्रत्येकालाच थिरकायला लावले. मराठी गाण्यांमध्ये नवनवीन प्रयोग करणारा हा प्रसिद्ध गायक आहे. त्याच्या नव्या रॅपसाँगला समीर सामंत यांनी शब्दबद्ध केले असून विक्रम बाम यांचे संगीत या गाण्याला लाभले आहे.
अवधूत गुप्तेच्या इतर गाण्यांप्रमाणेच हे रॅप सॉंग सुद्धा तितकेच उत्स्फूर्त आहे. हे गाणे रसिकांना थिरकवण्याबरोबरच विचार करायलाही भाग पाडणारे आहे. अतिशय नाजूक आणि संवेदनशील विषय या गाण्यात उत्तमरित्या आणि कोणाच्याही भावना न दुखावता हाताळण्यात आला असून त्यात माणुसकी हीच खरी जात हा एक महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला आहे. रॅप साँगची कल्पना कशी सुचली याबाबत अवधूत गुप्ते सांगतो, आजवर मी गाण्यांचे विविध प्रकार हाताळले. चित्रपट, लाइव्ह शो केले. परंतु काहीतरी राहून गेल्याचे सतत जाणवत होते आणि त्यातूनच मग या रॅप सॉंगची संकल्पना सुचली. अनेकांना वाटत असेल, की रॅप सॉंगसाठी असा ज्वलंत विषय का निवडला? तर आज आपण कितीही म्हटले, तरी अनेकदा हा मुद्दा डोकं वर काढतोच. समाजात इतर जातींपेक्षा माणुसकी ही एकच जात जास्त महत्त्वाची आहे, हे सांगण्याचा प्रांजळ प्रयत्न या गाण्यातून करण्यात आला आहे.’
पाऊस या म्युझिक अल्बममधून अवधूत गुप्ते याने मराठी संगीत विश्वात पदार्पण केलं. ऐका दाजीबा हे त्याचे गाणे गायिका वैशाली सामंतसोबत तुफान लोकप्रिय झालं होतं. महाराष्ट्राच्या राजकारणावर बेतलेल्या झेंडा या लोकप्रिय सिनेमाची निर्मिती करत अवधूतने सिनेमा निर्मितीच्या क्षेत्रातही एक वजनदार पाऊल ठेवलं होतं. खुपते तिथे गुप्ते या शोच्या माध्यमातून त्याने अनेक कलाकारांना बोलतं करत त्यांना खुपणाऱ्या गोष्टी त्यांच्या चाहत्यांसमोर मांडल्या होत्या. त्याचा हा शो खूप लोकप्रिय झाला होता. याशिवाय गाण्यांवर आधारित रिअॅलिटी शोचा परीक्षक म्हणून अवधूतची उपस्थिती नेहमीच रंजक आणि चैतन्यदायी ठरत आली आहे. तोडलस भावा, जिंकलस मित्रा हे परीक्षकाच्या खुर्चीवरून त्याने बोललेले शब्द आजही एखाद्याच्या कलेला दाद देण्यासाठी वापरण्यात येणारा अवधूत पॅटर्न ठरले आहेत.
कोल्हापूर ब्रँड अँबेसिडर असताना अवधूत गुप्ते याची पूरेपूर कोल्हापूर ही कविता खूप गाजली आहे. एक जिंदादिल कलाकार अशी ओळख असलेल्या अवधूतने रॅप साँग प्रकारात घेतलेली ही झेप त्याच्या चाहत्यांना नक्कीच एक मनोरंजनाचे आकाश मिळवून देईल का हे पाहण्यासाठी हे गाणं रिलीज होईपर्यंत वाट बघावी लागणार.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला