संतोषसाठी अवधूत बनला हेल्पिंग बर्ड

Santosh Juvekar-Avdhut Gupte

अडचणीच्या काळात जो आपल्याला मदतीचा हात देतो तो खरा मित्र- हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यातच असे अनुभव येतात असे नाही तर सेलिब्रिटींनाही अनेकदा अशा मदतीची गरज लागते. सेलिब्रिटीकडे सगळं काही असतं. पैसा असतो, प्रसिद्धी असते, त्यांनी एक फोन केला तर कुठूनही त्यांच्यापर्यंत मदतीचा हात पोहचू शकत असतो. पण कधी कधी अशी वेळ येते की, तिथे प्रसिद्धीचे वलय कामी येत नाही तर इंडस्ट्रीमध्ये जोडलेले मित्र मदतीला धावून येतात. सध्या लॉकडाऊनमुळे लंडनमध्ये अडकलेल्या अभिनेता संतोष जुवेकरला असाच मदतीचा हात देऊ केला आहे इंडस्ट्रीमधला दिलदार गायक अवधूत गुप्ते (Avadhut Gupte) याने.

लंडनमध्ये संतोष जुवेकर (Santosh Juvekar) अडकला आहे ही बातमी आता सगळ्या इंडस्ट्रीमध्ये आणि संतोषच्या चाहत्यांमध्ये पसरली आहे. त्यावरून संतोषला, तू कुठे आहेस? काय करतो आहेस? कसा आहेस? सुरक्षित आहेस ना? असे प्रश्न विचारणारे अनेक फोन आले. मात्र या विचारपूस करणाऱ्यांच्या गर्दीत एक आवाज अवधूत गुप्तेचाही होता, ज्याने संतोषला असं विचारलं की, संतोष तुला लंडनमध्ये काही पैशांची गरज आहे का? जवळचे पैसे संपले असतील तर मला सांग मी लगेच पाठवतो. इतकंच नव्हे तर आपण तुला लंडनमधून भारतात परत आणण्यासाठी काही प्रयत्न करता येतात का हेदेखील बघूयात. अवधूतच्या या अनोख्या मैत्रीच्या हाकेसाठी संतोषने त्याचे मनापासून आभार मानले आहेत. गेल्या महिनाभरात संतोष जुवेकर याच्या सोशल मीडिया पेजवरचे फोटो पाहिले तर आपल्याला लक्षात येईल की तो लंडनमध्ये ‘डेट भेट’ या सिनेमाच्या शूटिंगसाठी गेला होता. अभिनेता लोकेश गुप्ते हा सिनेमा दिग्दर्शित करत आहे. त्यासाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, हेमंत ढोमे, रिंकू राजगुरू, संतोष जुवेकर, सुव्रत जोशी अशी सगळी टीम लंडनमध्ये होती. शूटिंग अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू होतं.

१६ डिसेंबरला या सिनेमाच्या लंडनमधल्या शूटिंगचं शेड्युल संपलं आणि त्यानंतर कोरोनाची लाट आल्यामुळे लंडनमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याचा फटका या सिनेमाच्या क्रूला बसला आणि सगळी टीम लंडनमध्ये अडकून राहिली. १६ डिसेंबरनंतर जसे मार्ग मिळतील तसे इतर कलाकार भारताच्या दिशेने येण्यास सुरुवात झाली. संतोष हा २२ तारखेला भारतात येणार होता. तत्पूर्वी तो लंडनमधील त्याच्या मित्रांना भेटण्यासाठी थांबला होता. मात्र त्यापूर्वी लंडनवरून भारतात येणारी सर्व विमाने रद्द करण्यात आल्यामुळे संतोष जुवेकर अडकून पडला. सध्या संतोष सुरक्षित असून तो लंडनमधल्या एका मित्राच्या घरी राहिला आहे. अर्थात लॉकडाऊन झाल्यामुळे त्याला कोणत्याही मित्राला भेटता आलं नाही; शिवाय मित्रांबरोबर लंडनची भटकंती करण्याचाही त्याचा बेत होता; मात्र तोदेखील थांबला.

हे सगळं सुरू असतानाच संतोषने ऑनलाईन संवाद साधून तो लंडनमध्ये सुखरूप असल्याचे त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहचवले. मात्र हे सांगत असताना संतोष अवधूत गुप्तेचे आभार मानायला विसरला नाही. संतोष सांगतो, अवधूत गुप्ते हा मराठी इंडस्ट्रीमधला माझा खूप चांगला मित्र आहे. ‘एक तारा’ या त्याच्या सिनेमातदेखील मी काम केलं होतं. यानिमित्ताने मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की, अवधूतबद्दल अनेक किस्से आपण ऐकतो की तो नेहमी इतरांच्या मदतीसाठी धावून जातो आणि ह्या गोष्टीचा अनुभव मी घेतला. जेव्हा मी लंडनमध्ये अडकून होतो तेव्हा एके दिवशी मला अवधूतचा फोन आला आणि त्याने मला तू कसा आहेस? कुठे आहेस? सुखरूप आहेस का? ह्यातलं काहीही न विचारता फक्त एकच प्रश्न विचारला. तो प्रश्न असा होता की, तुझ्याकडे पुरेसे पैसे आहेत का? आणि जर नसतील तर मला लगेच सांग.

तुझ्या अकाउंटवर काही पैसे पाठवतो. तुला भारतात येईपर्यंत उपयोगी पडतील; शिवाय त्यापुढे जाऊन आपल्या काही प्रशासनातील ओळखीचा वापर करून चांगल्या पर्यायांचा शोध घेऊन तुला लवकरात लवकर भारतात कसे परत येता येईल याचाही आपण प्रयत्न करू. अवधूतने दाखवलेली ही समयसूचकता माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाची होती. या गेल्या काही दिवसांमध्ये संतोष लंडनमध्ये अडकला या गोष्टीची जितकी चर्चा झाली त्याहून कैकपटीने अधिक चर्चा अवधूत गुप्तेने संतोषला दिलेल्या या हाकेची झाली. याबद्दल अवधूत गुप्तेवरही त्याचे चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत. संतोष लंडनमध्ये सुखरूप आहे. त्याला घरची आठवण येत असली तरी अजून एक गमतीदार किस्सा संतोषने यानिमित्ताने शेअर केला. संतोषचं जेव्हा ठरलं की आपण लंडनमध्ये काही मित्रांना भेटून भारतात परत जायचं.

त्या वेळेला नाताळ अगदी तोंडावर होता आणि लंडनमधला झगमगता नाताळ या निमित्ताने आपल्याला बघायला मिळणार याचा संतोषला आनंद झाला होता; पण लॉकडाऊनमुळे लंडनमधला झगमगाट त्याला पाहता आला नाही. अर्थात त्यासाठी लॉकडाऊन हे कारण असल्यामुळे संतोषला वाईट वाटले नाही. पण गेली पाच वर्षे संतोष नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत नाही. काही न काही कामाच्या निमित्ताने नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी तो मुंबईबाहेरच आहे आणि यंदाही नव्या वर्षाच्या स्वागताला त्याच्या आवडत्या मुंबई शहरात नसणार आहे याचंही त्याला कुठे तरी वाईट वाटत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER