शरद ऋतुचर्या – ऋतुनुसार आहारात बदल स्वास्थ्य रक्षणार्थ आवश्यक !

Autumn & diet

बाह्य वातावरणाचा शरीराचे तापमान पाचन त्रिदोष यावर परीणाम होत असतो. ऋतुनुसार आहार व विहार बदलविणे आवश्यक असते. यालाच ऋतुचर्या असे म्हणतात. आयुर्वेद संहितेमधे स्वास्थ्य रक्षणार्थ ऋतुचर्या पालन करण्यावर विशेष भर दिला आहे. सहा ऋतुमधे सध्या शरद ऋतु सुरु आहे. शरद ऋतु म्हणजे काय या दिवसात मनुष्याचा आहार विहार कसा असावा जेणेकरून ऋतुबदलाचा त्रास शरीराला होणार नाही. शरद ऋतुचर्येचे वर्णन आयुर्वेद आचार्यानी केले आहे.

अश्विन कार्तिक मास शरद ऋतु असतो. शरद ऋतुचे वर्णन देखील आचार्यांनी केले आहे. या महिन्यांमधे आकाश स्वच्छ निरभ्र जमिनीवर थोडा थोडा चिखल असतो. वेगवेगळी फुले उमलेली असतात. मेघांचा समूह नाहीसा झाल्याने तीक्ष्ण बोचणारी प्रखर सूर्याची किरणे असतात. वर्षाऋतुमधील पाऊस व थंड वारा यामुळे शरीर थंड झालेले असते. त्यामुळे शरद ऋतुमधील तीक्ष्ण प्रखर सूर्यकिरणांमुळे पित्त प्रकुपित होते. अर्थात ज्यांचा आहार विहार चांगला असेल त्यांना त्रास होत नाही.

शरद ऋतुत आहार कसा असावा ?

या ऋतुत भूक लागल्यावर तांदूळ, गहू यव मूग मसूर या धान्यांचा वापर करून आहारीय पदार्थ बनवावेत. गोड पदार्थ दूध तूप यांचा समावेश असावा. खीर, बासुंदी घेऊ शकतो. कडू तुरट पदार्थ देखील आहारात असावे. मेथी, आवळे, मध, पडवळ, द्राक्षे, मनुका, डाळींब खडीसाखर यांचा समावेश करावा. फळभाज्या – भोपळा, पांढरा भोपळा दूधी, चवळी घेऊ शकतो. लाह्या, मोरावळा आहारात घ्यावे.
तेलापेक्षा तूपाचा वापर जास्त करावा.

काय घेऊ नये ?

हा काळ पित्त वाढविणारा असल्याने आंबट (चिंच, लिंबू इ.) खारट तिखट, आंबवलेले पदार्थ, तळलेले पदार्थ घेऊ नये. पनीर, दही, बेसन पापड घेऊ नये. पोट तडीस जाईल एवढे जेवू नये. मद्यपान करू नये.

विहार कसा असावा ?

हलके सुती कपडे घालणे. थंड वाळ्याचा स्नानाच्या वेळी वापर करणे. दिवसा झोपू नये. या ऋतुत अगस्ती ग्रहाचा उदय होतो. चंद्राच्या थंड प्रकाशात बसावे.

पंचकर्म चिकित्सा – या काळात शरीरात पित्त दोषाचा प्रकोप होत असतो त्यामुळे वैद्याच्या सल्ल्याने व देखरेखीखाली विरेचन रक्तमोक्षण चिकित्सा नक्की कराव्या. त्यामुळे शरीरातील दोष बाहेर काढल्या जातात व पित्ताचा त्रास होत नाही.

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER