शरद पौर्णिमा – आरोग्यदायी पौर्णिमा!

Sharad Pornima

आज शरद पौर्णिमा, कोजागिरी म्हणजेच को जागर्ति – कोण जागे आहे ? असा विचारणारा हा दिवस. प्रदेशानुसार वेगवेगळ्या पद्धतीने कोजागिरी साजरी केली जाते. कुठे भुलाबाईची गाणी तर कुठे गरबा खेळला जातो. एकत्र येऊन आनंदाने उत्साहाने रात्री जागरण करणे. मुख्य म्हणजे या उत्सवाचे सणाचे सर्वात मोठे आकर्षण असते आटवलेले दूध. चंद्राच्या प्रकाशात दूध आटवून हे रात्री पिणे शरद पौर्णिमेच्या सणाची पूर्तता असते.

शरद ऋतु सुरु झाला की शरीरातील उष्णता पित्त वाढते. चंद्राची शितलता थंडावा या उष्णतेला कमी करते. तसेच दूध हे उत्तम पित्तशामक उष्णता कमी करणारे व बल वाढविणारे असते. म्हणूनच सणाच्या निमित्ताने पूर्ण चंद्र, दूध यांचा योग्य संयोग या वाढलेल्या उष्णतेला कमी करणारा ठरतो.

दूध पचविण्याकरीता अग्नि मात्र चांगला असावा, पोट साफ असावे व भूक चांगली लागलेली असावी हे गरजेचे आहे. आटवलेले दूध पचायला जड असते. त्यामुळे रात्रीपर्यंत छान भूक लागणे आवश्यक आहे त्याकरीता भुलाबाईची गाणी, फेर फुगड्या गरबा यांचा समर्पक संयोग परंपरेने चालत आला आहे.

दूध आटवितांना त्यात अनेक मसाले टाकल्या जातात. काजू बदाम पिस्ता इ. घालून शाही बनविण्याच्या नादात ते पचायला जड बनते. त्याऐवजी विलायची, खडीसाखर जायफळ दालचीनी असे मसाले टाकणे जास्त फायदेशीर ठरते. ज्यांना कफविकार आहे ज्वर आहे कणकण असेल त्यांनी हे दूध घेऊ नये. शरद पौर्णिमा ही आरोग्यदायी पौर्णिमा नक्कीच आहे फक्त प्रकृती जठराग्नि यांचा विचार करून दुधाचे सेवन करणे गरजेचे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER