ऑटो रिक्षा टॅक्सी स्क्रॅपला वर्षाची मुदत वाढ

Auto Rickshaw - Taxi

कोल्हापूर : पेट्रोल-डिझेल ऑटोरिक्षा 16 वर्षे, एलपीजी ऑटोरिक्षा 18 वर्षे व टॅक्सी 20 वर्षे अशी वयोमर्यादा यापूर्वी राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्रादेशिक परिवहन प्राधिकारणाने निश्चित केली होती. त्यानुसार ही मुदत 31 मार्च 2020 रोजी संपली होती. त्यामुळे ही वाहने स्क्रॅप करावी लागणार होती. या वाहनांना 1 वर्षाची म्हणजे 31 मार्च 2021 पर्यंत मुदत वाढ देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षते खाली आणि पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी दिली.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने यापूर्वी निश्चित केलेल्या वयोमर्यादे नुसार 2823 पेट्रोलच्या, 396 डिझेलच्या, 2128 एलपीजीच्या रिक्षा अशा एकूण 5347 ऑटो रिक्षा त्याचप्रमाणे 13 पेट्रोल टॅक्सी, 112 डिझेल टॅक्सी, 61 एलपीजी टॅक्सी अशा एकूण एकूण 180 टॅक्सींची वयोमर्यादा 31 मार्च 2020 ला संपल्यामुळे सर्वांना वाहने स्क्रॅप करावी लागणार होती. बऱ्याच ऑटोरिक्षा संघटनांनी याबाबत प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे मुदत वाढवून मिळण्याबाबत विनंती केली होती.

कोरोना पार्श्वभूमीवर ऑटो चालकांवर ओढवलेले संकट पाहता ऑटो रिक्षा स्क्रॅप करून दुसरे मोठे संकट त्यांच्यावर ओढवणार होते. जिल्हाधिकारी अध्यक्ष, पोलीस अधीक्षक सदस्य व प्रादेशिक परिवहन अधिकारी सदस्य सचिव असणाऱ्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरण समितीने या सर्वांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून या निर्णयाला एक वर्षाची मुदतवाढ दिल्याने ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांना दिलासा दिला आहे. आता ही मर्यादा 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER