महिला प्रवाशांना पाहून हस्तमैथुन करणारा रिक्षाचालक अटकेत

मुंबई : तरुणी तसेच महिलांना पाहून हस्तमैथुन करणाऱ्या विकृत रिक्षाचालकाला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. मोहम्मद शकील अब्दुल कदर मेमन (३२) याला अटक केली आहे. मेमन हा मालाडचा रहिवासी आहे.

तक्रारदार तरुणी १ सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे काम उरकून रात्री ११.३० च्या सुमारास मालाड न्यू लिंक रोडवरील चिंचोली बंदर बसस्थानकाजवळ घरी जाण्यासाठी वाहनाची वाट बघत होती. ती एकटी असल्याचे हेरून मेमनने तिच्यासमोर रिक्षा थांबवली. तिला ‘रिक्षा में बैठो’ म्हणत हस्तमैथुन करू लागला. तरुणीने घाबरून त्याचा फोटो घेण्यासाठी मोबाईल काढला. तोच मेमन तेथून पसार झाला. तरुणीने आईला घडलेला प्रकार सांगून बोलावून घेतले. दोघींनी बांगुरनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरू केला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गुन्हे शाखेच्या कक्ष-११ नेही तपास सुरू केला. तपासात सीसीटीव्हीच्या मदतीने रिक्षाचा शोध घेत, मेमनला अटक केली.

मेमन हा भाडेतत्त्वावर रिक्षा चालवत होता. तो एकाच रिक्षावर नसे. तो रिक्षा वारंवार बदलत होता. त्याने अशा प्रकारे अनेकींना पाहून अश्लील वर्तन केल्याचा संशय गुन्हे शाखेला आहे.

ही बातमी पण वाचा : मुलगी बनून करत होता मुंबई, पुण्यातील व्यापाऱ्यांची फसवणूक…