भारतीय खेळाडूंना शिवीगाळ हे आॕस्ट्रेलियाचे निलाजरे मनसुबे!

‘एव्हरीथींग इज फेअर इन लव्ह अँड वार’ (Everything is fair in love and war) ही म्हण ऑस्ट्रेलियाने गंभीरतेने घेतलेली दिसतेय म्हणून भारतीय क्रिकेट संघ भारी पडतोय हे बघता त्यांनी भारतीय संघ (India Vs Australia) व खेळाडूंचे मनोधैर्य खच्ची करण्याचे उद्योग सुरु केले आहेत. रोहित शर्मासह (Rohit Sharma) पाच भारतीय खेळाडूंचे मेलबोर्नमधील रेस्टॉरंटमध्ये (Melbourne restaurant) गेल्यानंतर विनाकारण उठवलेले सोशल डिस्टन्सींग नियमांच्या उल्लंघनाचे वादळ आणि आता सिडनीच्या मैदानावर जसप्रीत बुमरा व मोहम्मद सिराज यांना झालेली रंगभेदी शिवीगाळ असले उद्योग त्यामुळेच आहेत. पूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडू स्वत: मैदानावर शिवीगाळ करायचे. त्यात त्यांनी खासी कीर्ती मिळवली होती. आता त्यांनी हे काम आपल्या समर्थकांवर सोपवलेले दिसतेय. मात्र भारतीय खेळाडूंनी त्यांचे हे इरादे हाणून पाळावेत, त्यांचे मनसुबे उधळून लावावेत हीच समस्त भारतीय क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे.

मेलबोर्न कसोटीला प्रेक्षकांची उपस्थिती चालते, सिडनी क्रिकेट ग्राउंडवर तर क्षमतेपेक्षा अधिक (१००७५) उपस्थिती चालते, ज्या ब्रिस्बेनमध्ये लॉकडाऊन पुन्हा लागला तिथेच चौथा कसोटी सामना खेळला जावा यासाठी त्यांचा आग्रह असतो पण पाच भारतीय खेळाडू सोबत रेस्टॉरंटमध्ये गेले आणि बाहेर न बसता आतमध्ये (तेसुद्धा पाऊस आल्यामुळे) बसले तर यांच्या नियमांचे उल्लंघन होते. त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवले जाते, चौकशी लावली जाते आणि त्यांचा संघ मात्र ॲडीलेडमधील विजयानंतर पार्टी करतो हे त्यांना चालते. ॲडीलेड कसोटीत ३६ धावांत बाद झाल्यानंतरही भारतीय संघाने ध्यानीमनीसुध्दा नसताना मेलबोर्न कसोटीत त्यांना चारीमुंड्या चीत केले आणि त्यानंतर नेमक्या सिडनी कसोटीआधी त्यांना हे उद्योग कसे समजतात हे न समजायला भारतीय क्रिकेटप्रेमी काही दूधखुळे नाहीत!

आता ते प्रकरण निवळले तर जे सातत्याने त्यांच्या फलंदाजांची परीक्षा घेताहेत त्या बुमरा (Jaspreet Bumrah) व सिराज (Mohammed Siraj) यांना त्यांनी टारगेट करायला सुरुवात केली आहे. सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवशी या दोघांना रंगभेदी शिवीगाळ (Racial abuse) करण्यात आली. भारतीय संघाने याबाबत सामनाधिकार्यांकडे अधिकृत तक्रार केलेलीच आहे. त्यातून जे काही समोर येईल ते येईल पण ऑस्ट्रेलियन्सनी भारतीय संघाचा धसका घेतलाय हे मात्र स्पष्ट आहे. तरी खेळाडूंच्या दुखण्यांमुळे भारतीय संघ पूर्ण ताकदीने खेळत नाहीये नाहीतर काय केले असते कुणास ठाऊक! आतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या धोरणात वर्णभेदाला अजिबात थारा नाही. त्यामुळे शिवीगाळच्या या प्रकरणात कठोर कारवाई व्हावी अशी अपेक्षा आहे.

शनिवारचा खेळ संपल्यावर कर्णधार अजिंक्य रहाणे व आर.अशि्वन हे या प्रश्नी पंच पॉल रायफेल व पॉल विल्सन यांच्याशी गंभीरतेने चर्चा करताना दिसले. रँडवीक एण्डला फाईन लेगच्या जागी क्षेत्ररक्षण करणाऱ्या मोहम्मद सिराजच्या बाबतीत हा प्रकार घडल्याचे रहाणेने पंचाच्या लक्षात आणून दिले. मद्यपान केलेल्या एका प्रेक्षकाने हा प्रकार केल्याचे सांगण्यात येत आहे. २००८ मध्येही हरभजनसिंग व सायमंडस दरम्यानच्या वादाचा इतिहास आहेच. त्यामुळे हे प्रकार काही नवीन नाहीत. फक्त भारतीय संघाने त्यांचे हे मनसुबे उधळून लावावेत एवढीच अपेक्षा आहे.

ही बातमी पण वाचा : IND vs AUS: सिडनी येथे जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज झाले जातीयवादाचे बळी, BCCI ने उचलले हे पाऊल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER