
अॕडिलेड कसोटीत (Adelaide Test) आॕस्ट्रेलियन गोलंदाजांनी तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा अक्षरशः फडशा पाडला. भारतीय संघाचा डाव फक्त 36 धावातच आटोपला आणि पहिल्या डावाअखेरची आघाडी मिळून आता आॕस्ट्रेलियाला विजयासाठी फक्त 90 धावा कराव्या लागणार आहेत. भारताचा शेवटचा गडी मोहम्मद शामी याला कमिन्स चेंडू लागल्याने रिटायर व्हावे लागले आणि 1974 मधील भारताची सर्वात कमी धावसंख्या 42 पार करण्याच्या आशा मावळल्या.
हेझेलवूडने 5 षटकात 8 धावात 5 तर कमिन्सने 10.2 षटकात 21 धावात चार गडी बाद केले. भारताच्या डावात एकही फलंदाज दोन आकडी धावा करु शकला नाही. मयांक अगरवालच्या 9 धावा सर्वोच्च ठरल्या आणि तोच सर्वाधिक 40 चेंडू खेळला. भारताने फक्त 11 धावात आज 7 गडी गमावले.
भारताच्या संकटात भर म्हणजे मोहम्मद शामी (Mohammed Shami) बहुधा गोलंदाजी करु शकणार नाही. त्याच्या गोलंदाजीच्या हातालाच कमिन्सच्या चेंडूचा मार बसला आहे.
भारताच्या 36 धावा ही कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकाची सर्वात कमी धावसंख्या आहे. न्यूझीलंडच्या 26 धावा (1955 वि. इंग्लंड) ही निचांकी धावसंख्या आहे.
सर्वच्या सर्व फलंदाज एकेरी धावातच राहिले असा कसोटी सामन्यांतील हा केवळ दुसरा डाव ठरला.याच्याआधी 1924 च्या बर्मिंगहॕम कसोटीत इंग्लंडच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या एकाही फलांदाजाला दोन आकडी धावा करु दिल्या नव्हत्या. त्यावेळी दक्षिण आफ्रिकन संघ 30 धावात बाद झाला होता.
आता आॕस्ट्रेलियाने 90 धावा करुन हा सामना जिंकला तर विराट कोहली (Virat Kohli) कर्णधार म्हणून नाणेफेक जिंकल्यावर पहिलाच सामना गमावेल.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला