एसीएच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना मिळाला धडा

Aussie cricketars ignored ACA advisory

भारतातील कोरोना (Corona In India) संक्रमणामूळे ऑस्ट्रेलियाने (Australis) 15 मे पर्यंत बंद केलेल्या आपल्या सीमा आणि कोरोनामुळेच अर्ध्यातच थांबवावी लागलेली इंडियन प्रिमीयर लीग (IPL) यामुळे अडकून पडलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना कोणत्याही टी-20 (T20 cricket) लीगमध्ये खेळायचा करार करण्याआधी कृपया आपला होमवर्क करा असा सल्ला ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनने (ACA) दिला आहे. या असोसिएशनचे मुख्याधिकारी टॉड ग्रीनबर्ग यांनी म्हटले आहे की, कोविड-19 संक्रमणाच्या काळात परदेशी टी-20 स्पर्धात खेळायचे धोके आणि त्याचे यंदाच्या आयपीएलवर होणारे परिणाम याचा अभ्यास करुनच टी-20 स्पर्धांचे करार करा असा सल्ला ऑस्ट्रेलियन खेळाडूंना देण्यात आलेला होता.

त्याकडे दुर्लक्ष करुन आयपीएलमध्ये खेळल्याने आता ऑस्ट्रेलियाचे खेळाडू, प्रशिक्षक व समालोचक अडकून पडले आहेत आणि 15 मेच्या आधी मायदेशी परतण्याचे त्यांचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. इकडे आयपीएलसुध्दा लवकर संपल्याने बायोबबलच्या सुरक्षेलाही ही मंडळी मुकली आहे. त्यामुळे ते आता भारताबाहेर पडून मालदीवमध्ये आश्रय घेण्याच्या तयारीत आहेत.

ग्रिनबर्ग यांच्याआधी पॕट कमिन्सनेही असेच मत व्यक्त करताना म्हटले होते की, सद्यस्थितीत आयपीएलशी करार करताना खेळाडूंना माहित होते की परिस्थिती कशी आहे पण आॕस्ट्रेलियन नागरिकांसाठी देशाच्या सीमा बंद राहतील या बदलाने एकूणच परिस्थिती अतिशय बदलून गेली आहे.

आयपीएल 2021 मध्ये सहभागी 41 ऑस्ट्रेलियन्समध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी करारबध्द, राज्य संघाशी करारबध्द आणि फ्रीलान्स असे सर्व प्रकारचे क्रिकेटपटू होते. त्या सर्वांना क्रिकेट आॕस्ट्रेलियाकडून ना हरकत गरजेचे होते पण सीए व राज्यांसोबत करार असलेले खेळाडू तिकडील सुटीच्या काळात इकडे आयपीएल खेळणार होते म्हणजे हा निर्णय त्यांचा स्वतःचा होता. ख्रिस लीन, डॕन ख्रिस्तियन व बेन कटींग यांना तर यंदा आयपीएलआधी पाकिस्तान सुपर लीगही अशीच अर्धवट सोडावी लागली तर जोश हेजलवूड, मिशेल मार्श व जोशा फिलीप यांनी सततच्या बबलमधील आयुष्याला कंटाळून आधीच आयपीएल खेळण्यास नकार दिला होता तर अँड्र्यू टाय, केन रिचर्डसन व अॕडम झम्पा हे आयपीएलमधून लवकर बाहेर पडून मायदेशी पोहोचण्यात यशस्वी ठरले आहेत. आता ह्या वाईट अनुभवामुळे आयपीएलमध्ये खेळण्यावर प्रतिकूल परिणाम होईल असे नाही पण करार करण्याआधी खेळाडू विचार करतील, अभ्यास करतील. जगभरातील स्थिती झपाट्याने बदलत आहे. आणि जगाच्या त्याभागात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. ऑस्ट्रेलियात अजुनही मोकळेपणा,आहे. तिकडच्यासारखी परिस्थिती नाही पण कोणताही निर्णय घेण्याआधी होमवर्क करुनच निर्णय घ्यायला हवा याचा धडा यातून निश्चितच मिळाला असणार असे ग्रिनबर्ग यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button