औरंगाबाद, संभाजीनगर अन् शिवसेनेची गोची

Shivsena & Aurangabad & Shmbhaji Nagar

औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर असे करण्याची शिवसेनेची (Shivsena) मागणी फार जुनी आहे. १९८८ च्या सुमारास महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी सर्वप्रथम ही मागणी केली होती. त्यावेळी हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेना मुंबईच्या (Mumbai) बाहेर आणि विशेषत: मराठवाड्यात हातपाय पसरू लागली होती. प्रत्येक गावाच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेच्या शाखेचे बोर्ड लागत होते. जय भवानी, जय शिवाजी असे लिहिलेले आणि शिवसेनेचा वाघ असलेले हे लक्षवेधी बोर्ड होते. गावागावात शिवसेनेची शाखा उघडण्याची स्पर्धा लागलेली होती.

शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाचे गारुड मराठवाड्यावर गारूड करून होते. अशा भारावलेल्या वातावरणात औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्याची मागणी खुद्द बाळासाहेबांनी केली आणि शिवसेनेने मराठवाड्यात पाय घट्ट रोवण्यास त्यामुळे मोठी मदत झाली. मात्र, गेल्या ३२ वर्षात या शहराचे नाव काही बदलले गेले नाही.

शिवसेनेची औरंगाबाद महापालिकेत सत्ता आली आणि सभागृहाने शहराचे नाव संभाजीनगर असे करण्याचा ठराव मंजूर करून राज्य शासनाकडे पाठविण्यात आला. १९९५ मध्ये राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार आले. त्यानंतर १९९९ ते २०१४ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता राहिली. २०१४ ते २०१९ पर्यंत भाजप-शिवसेनेचे सरकार राहिले पण हा ठराव पुढे सरकला नाही. आपल्या मागण्या मंजूर करवून घेण्यासाठी वा सरकारवर दबाव आणण्यासाठी शिवसेनेचे मंत्री खिश्यात राजीनामे घेऊन फिरायचे पण औरंगाबादचे संभाजीनगर करण्यासाठी असा दबाव शिवसेनेच्या मंत्र्यांनी आणल्याचे ऐकिवात नाही. शहराच्या नामांतराचा निर्णय हा केंद्र सरकारच्या अधिकारातील विषय आहे पण त्यासाठी राज्य सरकारने तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा लागतो. दरवेळी औरंगाबाद महापालिकेची निवडणूक आली की शिवसेनेकडून हा मुद्दा रेटला जातो पण नंतर तो विसरला जातो, असा भाजपचा आरोप आहे.

औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी एकेकाळी तीव्र आंदोलन झाले होते. दंगली, जाळपोळ, रस्त्यावरील हिंसक आंदोलनांनी वातावरण ढवळून निघाले होते. त्यानंतर दोन्ही बाजूंची बूज राखत या विद्यापीठाचे नाव डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे करण्याचा निर्णय १४ जानेवारी १९९४ रोजी झाला. नामांतराऐवजी त्यास नामविस्तार असे म्हटले गेले. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्याची शिवसेनेची मागणी मात्र अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. उस्मानाबादचे नाव धाराशिव असे करण्याची शिवसेनेची मागणीही जुनी आहे. आता अहमदनगरचे नाव बदलून ते अंबिकानगर असे करण्याची मागणी शिर्डीचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी केली आहे.

आता पुन्हा औरंगाबाद की संभाजीनगर हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. येत्या दोन महिन्यात तेथील महापालिका निवडणूक होऊ घातली आहे ही किनार अर्थातच त्याला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि मराठवाड्याचे सुपुत्र असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या नामांतरास विरोध केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमात अशा नामांतराचा कोणताही उल्लेख नाही, त्यामुळे हा विषय महाविकास आघाडीच्या अजेंड्यावरच नाही असे थोरात यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीकडून अद्याप या बाबत अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. औरंगाबाद महापालिका निवडणुकीत संभाजीनगरच्या मुद्याचा शिवसेनेलाच फायदा होणार याची पूर्ण कल्पना काँग्रेसला आहे. राष्ट्रवादीचे मात्र तळ्यातमळ्यात असल्याचे दिसते. शिवसेना इतकी वर्षे शहराचे नाव का बदलू शकली नाही,असे भाजपने डिवचले आहे. आता राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असताना निदान औरंगाबादच्या नामांतराचा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्राकडे पाठविला जाईल का या बाबत उत्सुकता आहे.

औरंगाबादमध्ये प्रभाव असलेला एमआयएमचा औरंगाबादकरांनी मोठ्या विश्वासाने तीस वर्षांपूर्वी शिवसेनेच्या हाती महापालिकेची सत्ता दिली. तेव्हापासून शहराचे नाव तर बदलले नाहीच पण औरंगाबादचा चेहरामोहराही बदलला नाही. रस्त्यांची आत्यंतिक दुरावस्था, साफसफाईच्या नावाने बोंब, उघडे नाले, नागरी सुविधांचा अभाव आणि पाण्याचा गंभीर प्रश्न या समस्या जशाच्या तशा आहेत. नागरी सुविधांच्या आघाडीवर आलेले अपयश झाकण्यासाठी तर शिवसेनेने आता संभाजीनगरचा भावनिक मुद्दा समोर केला नाही ना अशी चर्चा होत आहे.

नामांतराच्या या विषयात शुक्रवारी मनसेनेही उडी घेतली. अग्रलेख काय लिहित बसलात, नामांतर करायचं तर लवकर करा असा सल्ला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे. २६ जानेवारीपर्यंत हे नामांतर केले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही मनसेने दिला आहे. आताची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही, त्यांना कृती करणे जमत नाही असा टोलाही देशपांडे यांनी हाणला आहे. शिवसेनेच्या मुखपत्रात शुक्रवारी अग्रलेख लिहिण्यात आला असून बाळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षांपूर्वीच जाहीरपणे औरंगाबादचे संभाजीनगर केले होते आणि ते लोकांनी स्वीकारलेले आहे. आता सरकारी कागदांमध्येही लवकरच  दुरुस्ती केली जाईल असे म्हटले आहे. औरंगाबादचे संभाजीनगर हा लोकनिर्णय आहे. जे निजामी अवलादीचे आहेत ते औरंग्यापुढे गुडघे टेकत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे असा टोला या अग्रलेखात नामांतरास विरोध करणाऱ्या काँग्रेसला लावण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER