औरंगाबाद : २५ हजारांवर पर्यटकांचे ६० कोटी विमान कंपनी, हॉटेल्सकडे अडकले

Aurangabad news

औरंगाबाद : कोरोनामुळे यंदा पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. मागील तीन महिन्यांत देश-परदेशात पर्यटन करण्यासाठी बुकिंग केलेल्या शहरातील सुमारे २५ हजार पर्यटकांचे ६० कोटी रुपये विमान कंपन्या, रेल्वे, हॉटेल्सकडे अडकले आहेत. त्यातच विमान कंपन्यांनी ‘ऑक्टोबरपर्यंत पुन्हा प्रवास करा नाही तर पैसे मिळणार नाही’ अशी अडवणुकीची भूमिका घेतल्यामुळे पर्यटक आणि ट्रॅव्हल एजंट दोघेही अडचणीत आले आहेत. हे पैसे या कंपन्यांकडून परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती औरंगाबाद ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशनचे माजी सचिव मंगेश कपोते यांनी दिली.

मार्च ते जून दरम्यान २५ हजार पर्यटकांच्या मागणीवरून शहरातील १०२ ट्रॅव्हल्स एजंटने बुकिंग करत त्यांच्यासाठी विमान, रेल्वे, बस तिकिटे काढली होती. अॅडव्हान्स रक्कम देऊन हॉटेल्स बुकिंगही केले होते. मात्र लॉकडाऊन लागल्यामुळे सर्व पर्यटकांचे बेत रद्द झालेत.

रेल्वे परत करणार पैसे

ज्या पर्यटकांनी रेल्वे तिकिटांचे आरक्षण करून घेतले आहे, त्याचे परतावे हे रेल्वेच्या नियमाप्रमाणे होतील. ज्या पर्यटकांनी देशाबाहेर बुकिंग केले आहे त्यांच्या शुुल्कातील व्हिसा शुल्क व ट्रॅव्हल इन्शुरन्सची रक्कम रिफंड होणार नाही, उर्वरित रक्कम ही तेथील सप्लायरच्या नियमाने रिफंड होईल अथवा पुढच्या सहलीसाठी वापरता येईल; पण त्या वेळेस सहल खर्चाच्या रकमेत फरक आल्यास तो करावा लागणार आहे, असे ट्रॅव्हल एजंट असोसिएशनकडून सांगण्यात आले.

सरकारचे अजून सहकार्य नाही

पर्यटन व्यवसायातून शासनाला ‘जीएसटी’च्या माध्यमातून दरवर्षी खूप मोठी रक्कम मिळते. शिवाय परकीय चलनही माेठ्या प्रमाणावर देशात येते. मात्र कोरोनामुळे आता हा व्यवसाय ठप्प असून पुढील काही दिवस बंदच राहील. अशा वेळी सरकारने पर्यटन व्यावसायिकाला जो ज्या प्रमाणात ‘जीएसटी’ भरतो त्या प्रमाणात बिनव्याजी कर्ज द्यावे, अशी मागणी होत आहे. मात्र त्यावर अजून निर्णय झालेला नाही. त्यामुळे ट्रॅव्हल्स व्यावसायिक नाराज आहेत.

पर्यटकांनी सहकार्य करावे

कोरोनामुळे जगभरातील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. अनेकांचे पैसे अडकले आहेत. विमान कंपन्यांनीदेखील तिकीट रद्द करून पैसे देण्यास सध्या नकार दिला आहे. याबाबत त्यांच्याशी बोलणे सुरू आहे. सरकार आणि पर्यटक अशा दोघांकडूनही सध्या सहकार्याची अपेक्षा आहे. – मंगेश कपोते, माजी सचिव, औरंगाबाद, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER