औरंगाबाद लोकसभा : काॅंग्रेसच्या उमेदवारावर खैरेंचे यश अवलंबून

aurangabad lak sabha

भावनिक राजकारणाला भाळून  वर्षानुवर्षे औरंगाबादची जनता खासदारकीची माळ शिवसेनेच्या गळ्यात टाकत आली आहे. त्यात शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या राजकारणाचे मोठे योगदान आहे. हिंदू-मुस्लीम वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मराठवाड्यात पाय रोवले. ‘खान पाहिजे की बाण’ अशी भावनिक साद घालत बस्तान बसवले.

ही बातमी पण वाचा : अब्दुल सत्तार अपक्ष लढणार,औरंगाबाद काँंग्रेसमध्ये बंड

औरंगाबादची खासदारकी शिवसेनेकडे, महापालिका शिवसेनेकडे पण शहराचे बकालपण आजही कायम आहे. विकासाच्या नावाने बोंब आहे.शहरात सगळीकडे घाणीचे साम्राज्य दिसते. धड रस्ते नाहीत.  नागरी सुविधा बेपत्ता आहे. शिवसेनेला चांगली कामे करण्याची गरज वाटत नाही. कारण भावनिक राजकारण केले की विकासाचा मुद्दा विसरला जातो हा त्यांचा अनुभव आहे आणि त्याच आधारे त्यांचे राजकारण चालते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जहाल हिंदुत्वामुळे आकर्षित झालेला तरुण वर्ग आजही शिवसेनेच्या प्रेमात आहे.गेले चार टर्म याच भावनिकतेच्या घोड्यावर बसून चंद्रकांत खैरे हे लोकसभा जिंकत आले आहेत.त्यांच्या समाजाची या मतदारसंघात पाचशेही घरे नसतील. जातीपातीचा विचार न करता उमेदवारी देणाऱ्या शिवसेनेने मराठा आणि मुस्लिमबहुल असलेल्या या मतदारसंघात खैरे यांच्यासारख्यांना जातिचा विचार न करता निष्ठावान शिवसैनिक म्हणून उमेदवारी दिली आणि ती निवड सार्थ असल्याचेही सिद्ध केले. मात्र खैरे यांच्या बद्दल शिवसेनेच्या अंतर्गत नाराजी तर आहेच पण मतदारसंघात देखील ते पूर्वीसारखे लोकप्रिय राहिलेले नाहीत. गेल्या वेळी त्यांना मोदी लाटेने तारले. यावेळी त्यांना त्यांच्या मदतीसाठी सर्जिकल स्ट्राइक धावून येईल असे दिसते.

ही बातमी पण वाचा : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा : आवाज शिवसेनेचाच

2014च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांनी एक लाख 62 हजार मतांनी दणदणीत विजय मिळवला होता. त्यांनी काँग्रेसचे माजी आमदार नितीन पाटील यांना पराभूत केले. खैरे यांना ५ लाख 20 हजार 902 तर नितीन पाटील यांना ३ लाख 58 हजार 902 मते मिळाली होती. बहुजन समाज पार्टीला 37 हजार 419 मतांवर समाधान मानावे लागले होते. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी शिवसेनेकडे दोन, भाजपाकडे दोन,राष्ट्रवादीकडे एक आणि एमआयएम एक अशी स्थिती आहे. कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पक्ष सोडला आहे.  जाधव हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत व कन्नड तालुक्यात त्यांचे वडील रायभान जाधव ह्यांना मानणारा एक मोठा मतदार वर्ग आहे.औरंगाबाद पूर्वचे भाजपाचे आमदार अतुल सावे यांचे वडील मोरेश्वर सावे दोन वेळा खासदार होते.काँग्रेसने दमदार उमेदवार दिला तर खैरे यांची खैर नाही अशी परिस्थिती उद्भवू शकते.

हि बातमी पण वाचा : शिर्डी लोकसभा:शिर्डी के साई बाबा कोणाला पावणार?

औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्रीचे माजी आमदार कल्याण काळे हे खैरे यांच्या विरोधात तगडे उमेदवार ठरू शकतात. काळे यांना उमेदवारी दिली तर ते खैरेंना हरवू शकतात असा काँग्रेसअंतर्गत देखील  विश्वास आहे.त्याचवेळी स्वतः काळे खासदारकीला लढण्यास इच्छुक नाहीत. त्यांनी साडेचार वर्षे आपल्या विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. विधानपरिषदेचे माजी आमदार  झांबड यांचे नावदेखील चर्चेत आहे.  त्यांना माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा विरोध आहे. सत्तार यांनी कोचिंग क्लासेसचे संचालक असलेले  बनसोड यांचे नाव पुढे केले आहे. काँग्रेसच्या उमेदवारीचा घोळ, सर्जिकल स्ट्राइकमुळे मोदी आणि पर्यायाने युतीसाठी निर्माण झालेले पोषक वातावरण या पार्श्वभूमीवर खैरे पाचव्यांदा दिल्लीच्या गाडीत बसण्याच्या तयारीत आहेत. औरंगाबाद मतदारसंघावर 1989 पासून शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे.गेल्या 29 वर्षात शिवसेनेने लोकसभेची निवडणूक तब्बल सात वेळा जिंकली. त्यापैकी चंद्रकांत खैरे चार वेळा खासदार राहिले. मोरेश्वर सावे दोन वेळा खासदार होते. एकदा प्रदीप जयस्वाल जिंकले.अपवाद फक्त 1996 च्या निवडणुकीचा  होता.त्यावेळी काँग्रेसचे रामकृष्णबाबा पाटील यांनी शिवसेनेला पराभूत करून लोकसभा गाठली होती. मतदारांसमोर जातांना अपूर्ण पाणी पुरवठा व भूमिगत गटारे, रोजगार, धनगर आरक्षण आणि सत्तेत असतांना सुद्धा औरंगाबादचे न झालेले नामंतरण इत्यादी ज्वलंत प्रश्नांवर मतदारांची समजुत घालण्यावर खैरेंचे यश अवलंबून आहे. तसेच ओवेसी यांच्या नेतृत्वातील एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी हा या मतदारसंघात महत्त्वाचा फॅक्टर ठरू शकतो. वंचित आघाडीने केलेले मतांचे विभाजन खैरे यांच्या पथ्यावर पडेल.

ही बातमी पण वाचा : लोकसभा निवडणूक २०१९ ; सर्व टप्प्यात भाजपाला मतदान पण आव्हान कायम

समीकरणे 

औरंगाबाद लोकसभा मतदार संघात मराठा आणि मुस्लिम समाजाची लोकसंख्या प्रभावशाली असून लेवा पाटील, ब्राम्हण, वाणी व धनगर हा समाज सुद्धा महत्वाचा आहे. खुल्या प्रवर्गातील मतदार ३२ %, अनुसूचित जमाती ०३ %, इतर मागास वर्गातील २९ % , अनुसूचित जातींचे १३ % तर इतर २३ % मतदार आहेत.