औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालय चालणार सौर उर्जेवर

Aurangabad -Solar

औरंगाबाद : बहुतांश शासकीय कार्यालये सौर उर्जेवर चालवण्याचे नियोजन राज्य शासनाने केले आहे. औरंगाबाद महापालिकेत स्मार्ट सिटी योजनेतून हे काम हाती घेण्यात आले. जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तालयातही सोलार प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले असून जानेवारी अखेरीस जिल्हाधिकारी कर्यालयातील सोलार प्रकल्प सुरू होईल, तर विभागीय आयुक्तालयात त्यानंतर प्रकल्प कार्यान्वित होऊ शकतो असे सूत्रांनी स्पष्ट केले.

तत्कालीन जिल्हाधिकारी डाॅ. निधी पांडेय यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सौर उर्जेचा वापर करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांनी एनर्जी ऑडीट करण्याचेही आदेश दिले होते. मात्र त्यानंतर प्रकरण थंड बस्त्यात गेले. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी हे एनर्जी ऑडीट पूर्ण केले असून हा प्रकल्प लवकरच कर्यान्वित होईल. कर्यालयामध्ये १०० किलोवॅट क्षमतेचे युनिट सुरू करण्यात येईल्, डिसेंबर पर्यंत हे काम पूर्ण होण्याचे संकेत देण्यात आले होते. परंतु तसे झाले नाही. मात्र जानेवारी अखेरीस हे काम पूर्ण होईल, असे सूत्रांनी म्हटले आहे.

सोलार पावर संदर्भात महाराष्ट्र एनर्जी डेव्हलेपमेंट एजन्सी (मेडा) संस्थेसोबत चर्चा करण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सर्वेक्षणामध्ये कार्यालयातील विभाग , प्रत्येक शाखा तसेच अधिकाऱ्यांच्या दालनांमध्ये असलेल्या ट्यूब लाईट, संगणक, बल्ब, एसी, वॉटर कूलर अादी उपकरणांसाठी दरमहा किती युनिट वीज खर्च होतो याचा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाला एका महिन्यामध्ये सुमारे एक लाख रूपयांचे वीज बिल भरावे लागते. सौर उर्जेबाबत निर्णय झाला तरी सध्या असलेल विजेचे कनेक्शनही राखीव म्हणून ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर युनिट उभारणीसाठी तीन महिन्यांचा कालावधी आवश्यक आहे. त्यामुळे सप्टेंबर अखेर युनिटचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. गरज पडल्यास जिल्हा नियोजन समितीतून अधिकच्या निधीच्या तरतूद करण्यात येणार आहे.