मुलाच्या कोठडी मृत्यूबद्दल वडिलांना ५ लाख भरपाई औरंगाबाद खंडपीठाचा सरकारला आदेश

Aurangabad HC

औरंगाबाद : किरण अशोक रोकडे या शिर्डी येथील १५ वर्षे मुलाचा चार वर्षांपूर्वी झालेला मृत्यू पोलिसांनी कोठडीत केलेल्या अमानुष मारहाणीमुळे झाला होता असा निष्कर्ष नोंदवून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने किरणच्या वडिलांना राज्य सरकारने पाच लाख रुपयांची भरपाई द्यावी, असा आदेश दिला.

मयत किरणचे वडील अशोक रोकडे यांनी केली याचिका मंजूर करून न्या. तानाजी नलावडे व न्या. श्रीकांत कुलकर्णी यांच्या खंडपीठाने हा आदेश अलिकडेच दिला. त्यानुसार सरकारने भरपाईची रक्कम दीड महिन्यांत न्यायालयात जमा करायची होती. नंतर न्यायालयातून ही रक्कम किरणच्या दोन्ही पालकांना समान प्रमाणात वाटून दिली जायची आहे.

शिर्डीच्या साईबाबा मंदिरात एका महिलेची पर्स चोरल्याच्या आरोपावरून बंदोबस्तावरील पोलिसांनी ३१ मार्च, २०१६ रोजी ताब्यात घेतले होते. हे समजताच अशोक, त्यांची पत्नी व त्यांच्या दुसरा मुलगा लगेच शिर्डी पोलीस ठाण्यात धावले. पण पोलिसांनी काही दाद लागू दिली नाही किंवा किरणला भेटूही दिले गेले नाही. थोड्यावेळाने किरणला एका ब्लँकेटमध्ये गुंडाळून साई संस्थानच्या इस्पितळात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी किरणला मृत घोषित केले. किरणला पोलिसांनी ताब्यात घेणे व त्याचा मृत्यू रहे सर्व तीन साडेतीन तासांत घडले.

पंतप्रधान व राज्यपालांसह अनेक वरिष्ठांकडे फिर्यादी केल्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. सरकारी वकिलाने सांगितले की, किरणचा मृत्यू पोलिसांनी केलेल्या मारहाणीने झाला नाही. त्याने आत्महत्या केली. त्या संदर्भात शिंर्डी पोलीस ठाण्याच्या त्यावेळच्या सहाय्यक निरीक्षक संगिता रामदास राऊत, शिपाई शेख अय्यूब बाबू, सहाय्यक रझ्झाक अब्दुल बेहराम आणि पोलीस नाईक राजेंद्र भागचंद आव्हाड व हरिश्चंद्र बाबुराव माने यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

किरण जेमतेम १५ वर्षांचा होता. त्यामुळे त्याला कोठडीत ठेवणे बेकायदा होते. त्याच्या अटकेची पोलिस डायरीत रीतसर नोंद केली गेली नाहीव त्याला ताब्यात घेतल्याची माहिती घरच्यांना कळविली नाही. उत्तरीय तपासणीच्या अहवालावरून त्याचा मृत्यू मोरहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट दिसते, असे खंडपीठाने नमूद केले. तूर्तास भरपाईची रक्कम सरकारने द्यावी व नंतर किरणच्या मृत्यूबद्दल जे पोलीस कायद्यानुसार जबाबदार ठरतील त्यांच्याकडून ती वसूल करावी, असेही न्यायालयाने सांगितले.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER