औरंगाबाद : वंचितला आनंदराज आंबेडकरांची सोडचिठ्ठी

यापुढे स्वतंत्र अस्तित्व लढा

Anandraj-Prakash Ambedkar

औरंगाबाद :- वंचित बहुजन आघाडीमधून रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मौलाना आझाद संशोधन केंद्रात रिपब्लिकन सेनेची आज दुपारी महत्त्वाची बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आनंदराज आंबेडकर यांनी वंचितमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. यापुढे रिपब्लिकन सेनेचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून जे मित्र पक्ष जवळ येतील, त्यांच्यासोबत जाऊन सत्तेत जाण्याचा प्रयत्न करू.

राजकारणात कोण मित्र, कोण शत्रू हे ओळखणे कठीण असले तरी युद्धात सर्व काही माफ या तत्त्वानुसार वाटचाल करायची असे ठरवले आहे.

तसेच रिपब्लिकन सेना नव्याने उभारणार असल्याचे ते म्हणाले. अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे आनंदराज आंबेडकर सख्खे भाऊ आहेत.

महासत्तेचे स्वप्न पार धुळीस मिळाले

आनंदराज म्हणाले, सरकार आज जे काही देशात आणू पाहात आहे, ते दुर्दैवी होय. २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेवर आले, तेव्हा देश महासत्ता होण्याची स्वप्ने पाहात होता. मात्र हे स्वप्न आता पार धुळीस मिळाले आहे. जीडीपी रसातळाला गेला आहे. सीएए आणि एनआरसीचा भाजपला फटका बसणार आहे. भाजपकडे आता राम मंदिराचाही मुद्दा राहिला नाही. त्याचाही त्यांना फटका बसेल. सीएए आणि एनआरसीने देशाचा कोणताही विकास होणार नाही, असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.