सूतगिरण्यांचा लिलाव : थकीत कर्जवसुलीसाठी जिल्हा बँकेचे पाऊल

आमदार सुमनताई पाटील, आमदार अनिल बाबर, पृथ्वीराज देशमुखांच्या संस्था.

Cane Agro

सांगली : कोरानाच्या संकटातही सांगली जिल्हा बँकेने कर्जवसुलीसाठी धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. थकीत कर्जवसुलीसाठी बँकेने केन ॲग्रो एनर्जी या साखर कारखान्यासह स्वामी रामानंद भारती सहकारी सूतगिरणी तासगाव आणि खानापूर तालुका को ऑप. स्पिनिंग मिल्स विटा, या दोन सूतगिरण्यांचा लिलाव जाहीर केला आहे. या तीनही संस्था भाजपचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील व शिवेसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

जिल्हा बँकेचे थकीत कर्जवसुलीसाठी बड्या थकबाकीदार संस्थांवर कारवाई सुरू केली आहे. मार्चपूर्वी जिल्ह्यातील सहा संस्थांचा लिलाव काढण्यात आला. मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्याने या संस्था बँकेनेच लिलावात खरेदी केल्या. त्यामुळे मार्चला बँकेचा सुमारे २६५ कोटींचा एनपीए कमी झाला. मार्चअखेरपासून कोरोनाचे संकट सुरू झाले. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन, संचारबंदी यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या काळात सर्व उद्योगधंदे, आस्थापना बंद असताना जिल्हा बँक मात्र सुरू होती. केंद्र शासनाने अत्यावश्यक सेवा म्हणून लॉकडाऊनमध्येही बँका सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. तरीही गेले दीड-पावणेदोन महिने बँकेची कर्जवसुलीची मोहीम स्थगित ठेवण्यात आली होती.

बँकेने उर्वरित एनपीए कमी करण्यासाठी बड्या थकबाकीदार संस्थांवर कारवाई सुरू केली आहे. माजी आमदार व भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या केन ॲग्रो एनर्जी या साखर कारखान्यासह राष्ट्रवादीच्या आमदार श्रीमती पाटील यांची स्वामी रामानंद भारती सहकारी सूतगिरणी व शिवसेनेचे आमदार बाबर यांची खानापूर तालुका को. ऑप स्पिनिंग मिल या तीन थकबाकीदार संस्थांना जिल्हा बँकेने दोन महिन्यांपूर्वी सिक्युरीटायझेशन ॲक्ट अंतर्गत नोटीस बजावली होती. थकीत कर्जवसुलीसाठी बँकेने या तीन संस्थांच्या मालमत्तांचा प्रतीकात्मक ताबा घेतला होता. यानंतरही संबंधित संस्थांनी मुदतीत कर्ज परतफेड केले नाही. त्यामुळे या तीनही संस्थांचा थकीत कर्जवसुलीसाठी शुक्रवारी लिलाव जाहीर करण्यात आला.

केन ॲग्रो कारखान्याला जिल्हा बँकेने सुमारे १७५ कोटींचे कर्ज दिले आहे. कारखान्याच्या मालमत्तेचे बँकेने मूल्यांकन केल्यानंतर या कारखान्याची लिलावासाठी ११४ कोटी ३३ लाख ८६ हजार रुपये राखीव किंमत ठेवण्यात आली आहे. तर स्वामी रामादंन भारती सूतगिरणीची ५७ कोटी व खानापूर तालुका स्पिनिंग मिलची २८ कोटी रुपये राखीव किंमत आहे. ३ जूनपर्यंत निविदा दाखल करण्याची मुदत आहे. तर ६ जूनला निविदा उघडण्यात येणार आहे. बड्या नेत्यांच्या संस्थांवर थकबाकी वसुलीसाठी कारवाई झाल्याने जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER