सँडविच फॉरेव्हरमध्ये अतुलची हसवेगिरी

Atul Kulkarni

कलाकारांना खरंतर नकोच असतं कोणत्याही साच्यात अडकणं, पण एखादी भूमिका त्यांच्याकडे येते आणि ती लोकप्रिय झाली, प्रेक्षकांकडून पसंतीचा शिक्का मिळाला की कलाकार कधी अशा भूमिकांच्या त्याचत्याचपणात अडकतात हे त्यांनाही कळत नाही. पण मग, त्या कलाकारांना वेगळ्या प्रकारचा अभिनयही करण्याची क्षमता असूनही भूमिकेच्या ढाच्याचं कुंपण त्यांच्याभोवती पडतं. तरीही काही कलाकार ही चौकट मोडून काढत असतात. यापैकीच एक अभिनेता अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni). भूमिकांच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जात अतुलने सँडविच फॉरेव्हर या वेबसिरीजमध्ये विनोदी भूमिका साकारत विनोदाचे टायमिंग साधले आहे.

माझ्या या विनोदी भूमिकेसाठी मीदेखील खूप उत्सुक आहे असं म्हणत अतुलने त्याच्या सोशल मीडिया पेजवर फिंगर्सक्रॉस केल्या आहेत. मराठी सिनेमा, नाटक, मालिका, हिंदी सिनेमा यासह आता अतुल त्याचे नशीब ओटीटी प्लॅटफार्मवरही आजमावणार आहे. सँडविच फॉरेव्हर या सिरीजमध्ये अतुल एका कडक शिस्तीच्या वडीलांच्या भूमिकेत आहे. आता तुम्हाला हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे की एकीकडे अतुलची जर या वेबसिरीजमध्ये कडक शिस्तीच्या वडीलांची भूमिका असेल तर त्याला विनोदी छटा कुठून येणार. तर हीच सँडविच फॉरेव्हरची कमाल आहे. आपल्या मुलीने ज्याची नवरा म्हणून निवड केली आहे तो तिच्यासाठी योग्य नाही असं शंभरातल्या ९९ वडिलांना वाटत असतं. अशा वडीलांपैकीच सँडविच फॉरेव्हर या सिरीजमधला बाबा म्हणजे व्ही.के. सरनाईक हे पात्र अतुल रेखाटणार आहे. शिस्तप्रिय हा जरी अतुलचा ऑनस्क्रीन स्वभाव असला तरी या सिरीजमध्ये त्याचा वावर मिश्कील आहे. त्यामुळे तसं पहायला गेलं तर या भूमिकेला दोन छटा आहेत. अतुलला विनोदी भूमिकेत पाहणं ही त्याच्या चाहत्यांसाठी पर्वणी असेल यात शंका नाही.

अतुल सांगतो, या सिरीजच्या निमित्ताने मी ओटीटी हे माध्यम पहिल्यांदाच हाताळत आहे. या माध्यमाला सध्याच्या काळात चांगले दिवस आहेत. त्यामुळे ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या ज्या अपेक्षा आहेत त्या जाणून त्यासाठी अभिनय करणं हे माझ्यासाठी नवं शिकण्यासारखं होतं. एक कलाकार म्हणून माझ्या नेहमीच्या पठडीतल्या भूमिकांपलीकडे नव्या भूमिका साकारण्यासाठी माझा आग्रह असतो. मी जेव्हा नवं काही करायचं ठरवतो, किंवा नवीन काही भूमिका माझ्याकडे येते तेव्हा ती भूमिका मी यापूर्वी साकारलेली नाही ना असा विचार माझ्या मनात आल्याशिवाय राहत नाही. सँडविच फॉरेव्हर या सिरीजच्याबाबतीतही मी हाच विचार केला. याआधी कधीच न केलेली भूमिका आणि अभिनयाची शैली साकारण्याची संधी मला या निमित्ताने मिळाली. लोकांना हसवणं आणि रडवणं यासारखं अवघड दुसरं काही नाही. विनोदी अभिनयाची ढब पकडताना तो विनोद ओढूनताणून होत नाहीय ना हेही पहावं लागतं. त्यामुळे आजपर्यंत केलेल्या गंभीर भूमिकांपेक्षा मला ही विनोदी भूमिका साकारताना खूप दडपण होतं.

अतुल एक वेगळ्या धाटणीचा अभिनेता आहे. ध्यासपर्व, कैरी, वळू, मातीमाय, देवराई या सिनेमातील त्याच्या भूमिका नक्कीच गंभीर आहेत. तर नटरंगमध्ये त्याने रंगवलेली नाच्याची भूमिका प्रेक्षक म्हणून पाहणं हाच एक विलक्षण अनुभव आहे. प्रेमाची गोष्ट या सिनेमात काहीअंशी अतुलने त्याचे गंभीर भूमिकेचे वलय तोडले आणि त्याचा ऑनस्क्रीन रोमँटीक अंदाज दाखवला. त्याचा हा प्रयोग प्रेक्षकांनाही खूप आवडला होता. तो नेहमी गंभीर भूमिकांमध्ये दिसत असला तरी त्या प्रत्येक भूमिकेला वेगळ्या प्रकारे सादर करण्याची हातोटी हा अतुलचा यूएसपी आहे. बेळगाव हे त्याचं जन्मगाव असलं तरी वडील सोलापुरात स्थायिक झाले आणि तो सोलापूरकर झाला.

इंजिनीअरिंगमध्ये मन रमलं नाही म्हणून त्याने इंग्रजीमध्ये बीएपर्यंतच शिक्षण घेतलं. कॉलेजमध्ये तो अभिनयाकडे आकर्षित झाला. सोलापुरातील नाट्यआराधना या नाट्यसंस्थेशी जोडला गेला आणि पुढे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या संस्थेतून अभिनयात तरबेज झाला. हे राम आणि चांदनी बार या सिनेमासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. समुद्र, आपण सारे घोडेगावकर, चाफा, झाले मोकळे आकाश, गांधी विरूद्ध गांधी यासारख्या नाटकातील अतुलचा अभिनय म्हणजे मैलाचा दगड आहे. आता सँडविच फॉरेव्हरमधून अतुलचा विनोदी बाज काय कमाल करतो हे लवकरच दिसेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER