मुख्यमंत्री शिवसेनेचा असला तरी सत्तेच्या चाव्या राष्ट्रवादीकडेच; भाजपचा शिवसेनेला चिमटा

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या इच्छेविरुद्ध राज्यातील जवळपास ७० रखडलेल्या जल सिंचन प्रकल्पांना अखेर हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जवळपास दोन महिन्यांपूर्वी प्रकल्पांच्या मंजुरीचा प्रस्ताव मुख्य सचिवांकडे पाठवला होता. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची मर्जी नसल्याने या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नव्हती. मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जयंत पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित करत प्रकल्पांच्या मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांना भाग पाडले. आणि याच मुद्द्यावरून भाजपने मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली आहे.

मुख्यमंत्री शिवसेनेचा असला तरी चाव्या राष्ट्रवादीकडेच आहेत, असा चिमटा भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी काढला. “राष्ट्रवादीच्या हटवादासमोर मुख्यमंत्री झुकले” अशी बातमी आहे. हटवादीपणा करणं सोपं असतं; पण हट्ट पुरवणं किती कठीण असतं हे आता कळलं असेल. भाजपबरोबर सत्तेत असताना मित्रपक्षावर गरळ ओकणारे आता तोंडातून ब्रदेखील काढत नाहीत, असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. चक्रीवादळामुळे नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मदतीचे आश्वासन दिले. येत्या दोन-तीन दिवसांत पंचनामे पूर्ण होतील. यानंतर कुठे, किती आणि कशी मदत जाहीर करायची हे जाहीर करू. मदतीविना कोणीही वंचित राहणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनावर भातखळकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण केल्यावर मदतीची घोषणा केली जाईल, असे कोकण दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री सांगताहेत. गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीतील नुकसान भरपाई अजूनही कोकणवासीयांना मिळालेली नसताना परत एवढे धडधडीत खोटे बोलण्याचे धाडस यांना येते कुठून? असा खोचक प्रश्न विचारत बहुधा हा सामना इफेक्ट असावा, अशी मिस्कील टीकाही भातखळकर यांनी केली.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button