आमदार निवासाच्या पुनर्बांधणीचा ३०० कोटींचा गफला कोणाचा? अतुल भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे प्रश्न

Atul Bhatkhalkar - Maharastra Today
Atul Bhatkhalkar - Maharastra Today

मुंबई : मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हा सवाल केला आहे. तसेच हे कंत्राट तत्काळ रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेले पत्र :
मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीसाठी काढण्यात आलेल्या टेंडरवर प्रश्नचिन्हं त्यांनी पत्रात उपस्थित केले आहेत. आमदार निवासाचे ६०० कोटींचे कंत्राट रद्द करून ते तब्बल ९०० कोटींवर नेण्याचे काम महाविकास आघाडी सरकारकडून केले जात असून केवळ दोन वर्षांच्या कालावधीत हा खर्च तब्बल ६६ टक्क्यांनी कसा वाढला? हा ३०० कोटींचा गफला कोणाचा? असे प्रश्न करत, मुख्यमंत्र्यांनी हे कंत्राट तत्काळ रद्द करून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अन्यथा या संपूर्ण प्रकरणाची मुख्य दक्षता आयुक्तांकडे तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा भातखळकर यांनी दिला आहे.

तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीच्या कामाकरिता केंद्र सरकारची संस्था असलेल्या नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कार्पोरेशनसोबत ६०० कोटींचा करार केला होता. परंतु महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर तो करार रद्द केला. नवीन कंत्राटात केवळ विद्युतीकरणाच्या कामाकरिता तब्बल २५० कोटींचा खर्च दाखविण्यात आला आहे. तसेच या कामाच्या वास्तुविशारदांनी वाढीव ३०० कोटी रुपयांचा खर्च हा इमारतीच्या फिनिशिंगवर होणार असल्याचे सांगितले आहे. ६०० कोटी रुपयांच्या कामावर ३०० कोटी रुपयांची फिनिशिंग केली जाणार असल्याचे सांगणे म्हणजे यात नक्कीच मोठा घोटाळा असल्याची शक्यता आहे, असा दावा भातखळकर यांनी केला आहे.


सेंट्रल विस्टा इमारतीच्या बांधकामावरून टीका करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्या सरकारचा ‘कंत्राट’नामा व वायफळ खर्च दिसत नाही काय? महाराष्ट्रात कोरोनावर खर्च करण्यासाठी पैसे नसताना एवढ्या वाढीव दराने काढण्यात आलेले कंत्राट मुख्यमंत्र्यांनी तत्काळ रद्द करावे अन्यथा या विरोधात भारतीय जनता पार्टी मोठे आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button