शिवसेनेने आता फक्त हिरवा झेंडाच खांद्यावर घेणं बाकी आहे ; भाजपचे टीकास्त्र

Atul Bhatkhalkar - Shiv Sena

मुंबई :- शिवसेनेने मुस्लिम समाजातील लहान मुलांसाठी अजान पठण स्पर्धेचे आयोजन करण्याची घोषणा करताच भाजपाकडून त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला. शिवसेनेने आता खांद्यावर हिरवा झेंडा घेणंच बाकीय उरलंय, अशी टीका भाजप नेते, आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केली आहे.

शिवसेनेने हिंदुत्व कधीच सोडून दिलं आहे. त्यांचं हिंदुत्व केवळ नावाला आहे. आता तर अजान पठणाची स्पर्धा त्यांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांनी केवळ हिरवा झेंडा खांद्यावर घेणंच तेवढं बाकी राहिलं आहे, अशी टीका भातखळकर यांनी केली आहे. आम्ही अजान आणि मशिदीवरील भोंग्यांना नेहमीच विरोध केला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही मशिदीवरील भोंग्यांना विरोध केलेला आहे. मात्र, शिवसेनेला आता या गोष्टीचा विसर पडला आहे. त्यांचं हेच नवं ज्वलंत हिंदुत्व आहे, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.

ही बातमी पण वाचा : अजानला विरोध करणं गैर असल्याचं म्हणत शिवसेनेची अजान स्पर्धा

भगवदगीता पठण स्पर्धेच्या धर्तीवर शिवसेनेने (Shiv Sena) आता अजान पठण स्पर्धेचं आयोजन केलं आहे. मुस्लिम समाजातील लहान मुलांना अजानची गोडी लागावी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून ही स्पर्धा घेण्यात येत असल्याचं सांगतानाच अजानला विरोध करणं चुकीचं असल्याचं मत शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ (Pandurang Sakpal) यांनी सांगितलं.

मी बडा कब्रस्तानच्या बाजूला राहतो. त्यामुळे माझ्या कानावर रोजच अजान पडते. अजानमध्ये प्रचंड गोडवा असून अजानचं मला नेहमीच अप्रूप वाटत राहिलं आहे. त्यामुळेच मुस्लिम समाजातील मुलांसाठी अजानची स्पर्धा घेण्याचं माझ्या मनात आलं. अजान देणाऱ्या मुलांचे उच्चार, त्यांचा आवाज आणि पाठांतर पाहून त्यांना बक्षिस देण्यात येईल. या स्पर्धेचा खर्च शिवसेना करणार आहे, असं पांडुरंग सकपाळ यांनी सांगितलं.

मुस्लिम समाजातील लहान मुले अप्रतिम अजान देतात. त्यांच्या या कलागुणांना वाव देणं हा त्या मागचा हेतू आहे. अशी स्पर्धा देशात कुठे झाली असेल असे वाटत नाही. हा पहिलाच प्रयोग असून त्याला चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे, असेही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER