‘शिवशाही कॅलेंडर’वर उर्दू : शिवसेनेला हिंदुत्वाच्या सर्टिफिकेटची गरज नाही; भातखळकरांचा टोमणा

मुंबई : काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लिहिलेल्या पत्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वाबाबत प्रश्न केल्याने संतापलेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ‘आम्हाला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची (प्रमाणपत्राची) गरज नाही’ असे उत्तर दिले होते. आता, शिवसेनेने प्रकाशित केलेल्या २०२१ च्या ‘शिवशाही कॅलेंडर’वर मराठी, इंग्रजीसोबत उर्दू भाषेचाही समावेश आहे.

यावरून भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी टोमणा मारला, शिवसेनेला हिंदुत्वाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईतील शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सपकाळ यांनी अजान स्पर्धा आयोजित केल्याने विरोधकांनी शिवसेनेच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अजान स्पर्धेबाबत सपकाळ म्हणाले होते, “अजान एका धर्माची भावना आहे. अजानमध्ये खूप गोडवा आहे. त्यामुळे मनःशांती मिळते. मी बडा कब्रस्तानच्या शेजारी राहतो. त्यामुळे माझ्या कानावर रोजच अजान पडते. पाच मिनिटांच्या अजानमुळे कुणाला त्रास होत असेल, तर ही गोष्ट मिठाच्या खड्यासारखी समजून त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे.

मात्र, काही दिवसांतच सपकाळ यांनी – मुंबादेवी विधानसभेतील ‘फाउंडेशन फॉर यू’ नावाच्या संस्थेचे पदाधिकारी माझ्याकडे आले होते. त्यांनी अजानची स्पर्धा खुल्या प्रकारे आयोजित केली होती. ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यास मी त्यांना सुचवले आणि शुभेच्छा दिल्या. पण माझा स्पर्धेशी संबंध नाही, असा खुलासा केला होता. शिवशाही कॅलेंडरवर उर्दूबाबत शिवसेनेला टोमणा मारताना भातखळकर यांनी ट्विटरवर ‘शिवसेनेला हिंदुत्वाच्या सर्टिफिकेटची गरज नाही’ एवढेच ट्विट करून कॅलेंडरचा फोटो टाकला आहे. कॅलेंडरवर शिवसेना, शिवशाही प्रतिष्ठान आणि युवा सेनेचाही उल्लेख आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER