सोनू सूदकडे जाहिरात जगताचे लक्ष

Sonu Sood

Chandrakant Shindeएखाद्या आघाडीच्या कंपनीला आपल्या उत्पादनाची जाहिरात करायची असेल तर कंपन्या जनतेमध्ये प्रचंड लोकप्रियता असलेल्या व्यक्तीला आपला ब्रॅन्ड अँम्बेसेडर बनवतात. त्यामुळेच आघाडीचे कलाकार, क्रिकेटर यांना जाहिरात जगतातून खूप मागणी असते. बॉलिवूडमध्ये तिन्ही खान, अक्षयकुमार, टायगर श्रॉफ, अमिताभ बच्चन यांचा बोलबाला होता आणि आहे. यात आता रस्त्यावर उतरून सामान्यांना मदत करणारा अभिनेता सोनू सूदचीही भर पडली आहे. सोनू सूदचे नवे रूप पाहून पेप्सी कंपनीने त्याला आपल्या सोशल डिस्टन्सिंगच्या कॅम्पेनसाठी साईन केले आहे.

अभिनेता सोनू सूदचे नाव चित्रपटातील त्याच्या खलनायकी भूमिकेमुळे जनतेला ठाऊक आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून सोनू सूदने पडद्यावरील खोटा नायक म्हणून नव्हे तर रियल लाईफमधील खरा नायक म्हणून संपूर्ण देशात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक मजूर पायीच चालत आपल्या गावी, राज्यांमध्ये चालले होते. केंद्र आणि राज्य सरकार या मजुरांना मदत करीत असतानाच सोनू सूदने मैदानात उडी घेतली आणि मजुरांना स्वखर्चाने घरी पाठवण्यास सुरुवात केली. आणि त्यामुळेच गुगल ट्रेंड्सवर सोनू सूद ‘भाई’ नावाने अग्रेसर असून त्याने सलमान खानवरही मात केली आहे. लॉकडाऊनच्या काळात सलमान खानने चित्रपटसृष्टीतील २५ हजार कुटुंबांना जेवण पुरवण्याचे काम करण्यासोबतच अनेकांना आर्थिक मदतही केली आहे.

पनवेल येथील फार्म हाऊसवर लॉकडाऊन असताना त्याने हिंदू-मुस्लिमांमधील भेदभाव नष्ट व्हावा म्हणून ईदच्या पार्श्वभूमीवर एक गाणे तयार करून ते सोशल मीडियावर प्रदर्शित केले. त्याअगोदरही त्याने एक गाणे तयार केले होते आणि आता काही दिवसांपूर्वी सलमानने स्वतःचा हॅन्ड सॅनिटाझजरही बाजारात उतरवला आहे. असे असले तरी सोनूने सलमानवर लोकप्रितेच्या बाबतीत मात केली ती आपल्या अनोख्या कामाच्या जोरावर. रस्त्यावरून चालणारे मजुरांचे तांडे पाहून त्याला दुःख झाले आणि त्याने लगेचच मजूर आणि विविध ठिकाणी अडकलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचवण्यास सुरुवात केली. यासाठी त्याने त्याच्या ट्विटरवर एक हेल्पलाईन क्रमांक जारी केला आणि जो कोणी त्याच्या ट्विटवर मदतीची मागणी करील त्याला त्वरित मदत देण्यास त्याने सुरुवात केली.

ही बातमी पण वाचा:- फ्लॅशबॅक:पराभव कसा स्वीकारावा हे दाखवणारा ‘सवाल माझा ऐका’

केवळ मुंबई, महाराष्ट्रच नव्हे तर देशातील कोणत्याही राज्यात कुठेही अडकलेल्यांनाही त्याने मदत केली आहे. त्याला ट्विट केल्यानंतर तो लगेचच मदत मागणा-याला आश्वस्त करतो. सोनूच्या केवळ आश्वस्त करण्यानेही अनेक मजुरांना बळ आल्याचेही दिसून आहे. या मजुरांना गावी पोहचवण्यासाठी त्याने ट्रेन, बस, खाजगी गाड्या, एवढेच नव्हे तर जेथे शक्य झाले तेथे विमानाचीही सोय करून दिली आहे. सोनूच्या मदतीने आपल्या गावी जाऊन आईला भेटणा-या एका मजुराने सोनू सूदला देव म्हणत त्याची आरती केली.

सोनूची पूजा करतानाचा त्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असला तरी सोनू सूदने मात्र आपल्या त्या प्रशंसकाला, मी देव नाही, असे करू नको, असे सांगून त्याच्यात असलेल्या माणुसकीचे दर्शन घडवले आहे. चित्रपट समीक्षक आणि अभिनेता केआरकेने ट्विटरवर एका पोलचे आयोजन केले. यात त्याने प्रश्न विचारला की, आता जर सोनू आणि सलमानचा चित्रपट प्रदर्शित झाला तर तुम्ही कोणाचा चित्रपट पाहाल? यावर सोनूला ६५ टक्के तर सलमानला ३५ टक्के मते मिळाली. सोनूचे इन्स्टाग्रामवर ३२ लाख फॉलोअर्स आहेत. या सर्व बाबी लक्षात घेऊन पेप्सी कंपनीने इन्स्टाग्रामवर सोशल डिस्टन्सिंगचे कॅम्पेन करण्यासाठी सोनू सूदला साईन केले आहे.

सोनूने यापूर्वी कुठलीही जाहिरात केलेली नाही. त्याची ही पहिलीच जाहिरात असून पेप्सीसारख्या कंपनीने त्याची जनमानसातील लोकप्रियता पाहूनच त्याला मोठी रक्कम देऊन साईन केले आहे. सलमान खान अगोदरच कोकसाठी अशा प्रकारचे कॅम्पेन करीतच आहे. गीतेत म्हटलेच आहे, फळाची अपेक्षा न धरता काम करीत राहा. फळ कधी न कधी मिळेलच. सोनूने मजुरांना गावी पाठवण्याचे काम नाव कमवण्यासाठी सुरू केले नव्हते; परंतु त्याला जे लाखो लोकांचे आशीर्वाद मिळाले आहेत त्याच्या जोरावर तो आणखी पुढे जाईल यात शंका नाही

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER