शब-ए-बारातनिमित्त घरीच नमाज पठण करा; पवारांसोबतच पोलिसांचेही मुस्लिम बांधवांना आवाहन

श्रीगोंदा : मुस्लिम बांधवांचा महत्त्वाचा मानला जाणारा आज शब-ए-बारातचा दिवस आहे. या दिवशी दरवर्षी मुस्लिम बांधव कब्रस्तानमध्ये एकत्र जमतात व प्रार्थना करतात. मात्र, यंदा संपूर्ण जगावरच कोरोना विषाणूचे संकट असल्यामुळे देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. महाराष्ट्रात संचारबंदी लागू आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने मुस्लिम समाजाला महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत; शिवाय शहरातील कब्रस्तानजवळ पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार असून, सर्वांनी या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी केले आहे.

‘सत्ता असो वा नसो हा माणूस भविष्यात महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा नेता असेल’ ! सोशल मीडियावर व्हायरल

सर्वांनी शासकीय नियमांचे पालन करावे. कुणीही घराबाहेर पडू नये. तसेच अत्यावश्‍यक सेवा सुरू असल्याने तेथेही गर्दी करू नये, असे आवाहन पोलीस वारंवार करत आहेत. या संदर्भात मुस्लिम धर्मगुरू मौलाना महिनुद्दीन अत्तार व मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी असिफ पठाण यांच्याशी जाधव यांनी चर्चा केली. शब-ए-बारातची नमाज सर्वांनी आपल्या घरीच पठण करावी; शिवाय कब्रस्तानमध्ये कोणीही जाऊ नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे जाधव यांनी सांगितले. दरम्यान, याआधीच महाराष्ट्र सरकारकडूनही सूचना देण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व मुस्लिम बांधवांना शब-ए-बारातनिमित्त घरीच नमाज पठण करण्याचे याआधीच आवाहन केले होते.