शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न : रामदास आठवलेंचा आरोप

Ramdas Athawale

कोल्हापूर : : केंद्र सरकारचा (Central Government) कृषी कायदा हा शेतकऱ्यांच्या विरोधातील नाही. पंजाब व हरियाणातील शेतकऱ्यांना काही संघटना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. असे न करता विरोधकांनी येत्या अधिवेशनात आपले मुद्दे मांडावेत, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) आज कोल्हापुरात केले.

आठवले म्हणाले, कृषी कायद्याविरोधात भारत बंद करण्याचा सर्वांना अधिकार आहे. मात्र, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा या आंदोलनाला पाठिंबा नाही. ज्या वेळी हे तीन कृषी कायदे बनले त्यावेळी राज्यसभेमध्ये आमचा त्याला पाठिंबा होता. हा कायदा शेतकऱ्यांच्या विरोधात नाही.

या कायद्याला विरोधाचे कारण देत पंजाब आणि हरियाणामधील शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न होत आहे. देशातील शेतकरी या कायद्याच्या विरोधात नाहीत. मात्र, काही संघटना राजकारण म्हणून विरोध करत आहेत. पंजाब आणि हरियाणामध्ये या आंदोलनाला प्रतिसाद मिळेल; पण इतर ठिकाणी प्रतिसाद मिळेल असे वाटत नाही, असे आठवले म्हणाले. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे.

कृषी कायद्यातील काही त्रुटी दूर करण्यासाठी सरकार तयार आहे. त्यामुळे शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका न घेता सरकारला बदल सुचवावेत. तडजोडीची भूमिका घ्यावी. केंद्र सरकारने कोणतीही भूमिका घेतली तरी विरोधक हे विरोध करतच राहणार. लोकशाहीने कायदा करण्याचा अधिकार दिला आहे. तसेच कायद्यामध्ये बदल करण्याचा अधिकारसुद्धा दिला आहे. येणाऱ्या अधिवेशनामध्ये विरोधकांनी आपले मुद्दे मांडावेत, मग त्याचा विचार केंद्र सरकार करेल, असेही आठवले म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER