जळगाव येथे भाजपाचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न; एकाला अटक

BJP Flags

जळगाव : रस्त्यावरील पालापोचाळा व कचरा टाकून मध्यरात्री ‘वसंत स्मृती’ हे भाजपाचे (BJP) कार्यालय जाळण्याचा प्रयत्न झाला. रविवारी सकाळी हे उघडकीस आले. पोलिसांनी या प्रकरणी विजय श्रीराम पवार (४०, रा.बळीराम पेठ) याला अटक केली आहे.

विजय हा भाजपाचाच कार्यकर्ता असून यापूर्वी त्याने भाजपाच्या बैठकीत माजी मंत्री गिरीश महाजन यांना शिवीगाळ व मध्यप्रदेशच्या माजी मंत्र्यांच्या वाहनावर दगडफेक केली होती. पक्षाने मात्र तो भाजपाचा कार्यकर्ता नसल्याचे सांगून तो मनोरुग्ण असल्याचे जाहीर केले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री २ वाजताच्या सुमारास भाजपा कार्यालयातील उजव्या हाताचा लाकडी दरवाजा कचरा व पालापाचोळा टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला. दरवाजा जळून खाक झाला तरी कोणाला काही कळले नाही. काही लोकांनी कार्यालय जाळताना पाहिल्याची चर्चा आहे. भाजपाचे कार्यालयीन कामकाज पाहणारे प्रकाश भगवानदास पंडित (५२, रा.विवेकानंद नगर) यांनी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दिली.

शनिवारी संध्याकाळी ७.३० वाजता कार्यालय बंद करून घरी गेले. रविवारी सकाळी ७.५७ वाजता कार्यालयात कामकाज करणारे गणेश माळी यांना हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी प्रकाश पंडित यांना घटनेची माहिती दिली. पंडित लगेच आले. पाहणी केली असता लाकडी दरवाजा जळून खाक झाला होता. आतील कागदपत्रे व इतर साहित्य मात्र सुरक्षित होते. प्रकाश पंडित यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरवाजाचे दोन हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

एकाला घेतले ताब्यात
गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाधिकारी उल्हास चऱ्हाटे यांनी चौकशी केली असता हा प्रकार विजय श्रीराम पवार यांनी केल्याचे उघड झाले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन दुपारी अटक केली. गेल्या महिन्यात ३१ ऑक्टोबर रोजी कोअर कमिटीची बैठक होती. त्यावेळीदेखील विजय याने माजी मंत्री गिरीश महाजन यांना शिवीगाळ केली होती व मध्यप्रदेशचे माजी मंत्री अशोक उईके यांच्या वाहनावर दगडफेक केली होती. पक्षाने त्यावेळी पोलिसात तक्रार देणे टाळले होते. विजय हा मनोरुग्ण आहे व तो स्व. प्रमोद महाजन यांच्या फोटोनजीकच्या सोफ्यावर झोपून बिडी पीत असल्याच्या कारणावरून महाजन यांनी त्याला हटकले होते. तेव्हा त्याने शिवीगाळ केली होती, असे खुद्द गिरीश महाजन यांनी पत्रकारांना सांगितले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER