शिक्षणमंत्री उदय सामंत यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; आंदोलक ताब्यात

शिक्षणमंत्री उदय सामंत यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, आंदोलक ताब्यात

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) विभाजन करणारा निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा. या प्रमुख मागणीसाठी आज सकाळी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर एमआयएम विद्यार्थी आघाडी, रिपब्लिकन विद्यार्थी सेना, पँथर विद्यार्थी आघाडीच्या विद्यार्थी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी शिक्षणमंत्री उदय सामंत येताच विद्यार्थी संघटनांनी काळे झेंडे दाखवत त्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी समयसूचकता दाखवत त्यांना तत्काळ ताब्यात घेतले.

शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न करणार त्यापूर्वीच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये एमआयएम विद्यार्थी आघाडीचे डॉ. कुणाल खरात तसेच सचिन निकम, गुणरत्न सोनवणे, रोहित धनराज, अतुल कांबळे, आवेज शेख या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी विद्यार्थी संघटनेच्यावतीने काळ्या रंगाचे निवेदन, काळ्या रंगाचे झेंडे दाखवीत निषेध करण्यात आला.

संघटनाच्यावतीने पदवी परीक्षा व निकालाबाबतचा संभ्रम दूर करण्यात यावे, नामांतर शहिदांचे स्मारक तत्काळ उभारण्यात यावे तसेच सर्व प्रकारचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क ५० टक्के करण्यात यावे; शिवाय मागील काही वर्षांपासून राजकीयदृष्ट्या लाभ उठवण्याच्या हेतूने उस्मानाबाद उपकेंद्रास स्वतंत्र विद्यापीठ म्हणून निर्माण करण्याचा घाट घातला जात आहे. मराठवाड्यात जातीय दंगली व्हाव्यात, आंबेडकरी तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त व्हावे, भावनिक प्रश्नांभोवती त्यांना गुंतवून ठेवता यावे अशी विचारसरणी असल्याचा आरोप करण्यात आला.

या सदरचे प्रस्तावित विभाजन तत्काळ रद्द करावे, विभाजनासाठी नेमलेली अभ्यास समिती तत्काळ बरखास्त करावी, विद्यापीठ विभाजनाचे अधिकार व मंडळावरील सदस्यांची तत्काळ हकालपट्टी करावी या मागण्यांसाठी घोषणाबाजी करत विद्यापीठ गेटसमोर आंदोलन करण्यात आले.

दरम्यान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विभाजनाचा निर्णय अद्याप झाला नाही आणि होणार नाही, असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे. काही लोक अफवा पसरवतात आणि राजकारण करतात असं सामंत यांनी म्हटलं आहे. तसंच नापास झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा एक महिन्यात घेणार असल्याचंदेखील ते म्हणाले. गतवर्षीप्रमाणे या वर्षीही पदवी देणार असून पदवीचा आदर पूर्वीप्रमाणे केला पाहिजे. असं कोणी करत नसेल तर राज्य सरकार कारवाई करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER