स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

Ravikant Tupkar

बुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यावर आज (दि.९) जीवघेणा हल्ला झाला. एकाने कुऱ्हाडीने तुपकर यांच्यावर हल्ला केला. या घटनेत ते सुदैवाने बचावले; परंतु त्यांचा स्वीय सहायक गंभीर जखमी झाला असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी संशयित हल्लेखोर जनार्दन दगडू गाडेकर यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) तालुक्याच्या दौऱ्यांवर होते. ते सायंकाळी बुलडाण्यात परतले. ते चिखली रोडवर असलेल्या कार्यालयात बसले होते. दरम्यान ते पाहुण्यांना सोडण्यासाठी बाहेर आले असता एक अज्ञात व्यक्ती त्यांच्या वाहनाचा नंबर लिहीत होता. यावेळी रविकांत तुपकर यांच्या स्वीय सहायक सौरभ पडघान यांनी संबंधिताला जाण्यास सांगितले. यावेळी रविकांत तुपकर यांच्यावर गाडेकर नावाच्या व्यक्तीने कुऱ्हाडीने वार करण्याचा प्रयत्न केला.

हा वार त्यांचे अंगरक्षक गणेश चाटे यांनी रोखला. मात्र दुसरा वार गाडेकर याने केला असता कु-हाड उलट्या बाजूने स्वीय सहायक सौरभ पडघान यांच्या छातीत लागल्याने ते जखमी झाले. त्यानंतर तेथे गोंधळ झाला. या घटनेत सुदैवाने रविकांत तुपकर थोडक्यात बचावले. सौरभ पडघान यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.दरम्यान या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी आरोपी जनार्दन दगडू गाडेकर याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडील कुऱ्हाड व अन्य हत्यारही ताब्यात घेतले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER