
मुंबई : मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास एटीएसकडे देण्याचा निर्णय गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केला आहे. विधिमंडळाचं कामकाज संपल्यानंतर गृहमंत्री देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना हा मोठा निर्णय जाहीर केला.
मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षाने आज सभागृहात केली होती. याविषयावरुन सभागृहात चर्चाही पार पडली तसंच गृहमंत्र्यांनी निवेदनही दिलं. त्यानंतर आता मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास एटीएसकडे देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे.
मनसुख हिरेन संशायस्पद मृत्यूप्रकरणावरून आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात विधानसभेत चांगलीच जुंपली. या प्रकरणात एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझेंवर आरोप केल्यानंतर तुम्ही कुणाला वाचवत आहात? असा सवाल फडणवीस यांनी करताच अर्णव गोस्वामींना आत टाकलं म्हणून तुमचा वाझेंवर राग आहे का?, असा पलटवार अनिल देशमुख यांनी केला. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला होता.
मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर पोलिस आयुक्तांनी अधिवेशनात येऊन अनिल देशमुख यांची भेट घेतली. त्यानंतर देशमुख यांनी विधानसभेत या विषयावर निवेदन दिलं. हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूची माहिती दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणावर काही प्रश्न उपस्थित केले.
ही बातमी पण वाचा : मनसुख हिरेन पट्टीचे पोहणारे, नक्कीच घातपात झाला असणार; निकटवर्तीयांचा दावा
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला