टेनिसच्या त्रिमुर्तीला यंदाचे एटीपी पुरस्कार

djokovic-nadal-federer

टेनिसमधील त्रिमुर्ती नोव्हाक जोकोवीच, रॉजर फेडरर व राफेल नदाल यांच्यासह फ्रान्सिस टिफो हे यंदाच्या असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स (एटीपी) (ATP award) च्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. जोकोवीच हा विक्रमी सहाव्यांदा वर्षअखेर क्रमवारीत नंबर वन आहे. त्याने ऑस्ट्रेलियन ओपनसह चार स्पर्धा जिंकल्या आहेत. शिवाय क्रमवारीत त्याने पहिल्या क्रमांकावर तिनशे आठवडे पूर्ण केले आहेत.

रॉजर फेडररने यंदा केवळ सहाच एकेरी सामने खेळले असले तरी त्याला चाहत्याकडून सर्वात लोकप्रिय टेनिसपटूचा पुरस्कार मिळाला आहे. सलग 18 व्या वर्षी त्याला हा लोकप्रियतेचा पुरस्कार मिळाला आहे.

राफेल नदालला सलग तिसऱ्या वर्षी स्टिफन एडबर्ग खेळाडूवृत्ती पुरस्कार मिळाला आहे. त्याला चौथ्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे.

रशियाच्या आंद्रे रुबलेव्हची सर्वात प्रगतीशील खेळाडू म्हणून निवड झाली आहे. तो यंदा सार्वाधिक पाच स्पर्धा जिंकून क्रमवारीत 23 व्या स्थानाहून आठव्या स्थानी पोहोचला आहे.

फ्रान्सिस टिफो याला समाजसेवेसाठी आर्थर अॕश मानवता पुरस्कार देण्यात आला. या अमेरिकन खेळाडूने कोविड- 19 मदतनिधीसाठी स्मृतीचिन्हे विकून निधी जमवला होता. जॉर्ज फ्लयड हत्यांकांडानंतर त्याने कृष्णवर्णी समुदायालाही एकत्र आणण्याचे काम केले होते.

तीन चॕलेंजर स्पर्धा विजेत्या स्पेनच्या कार्लोस अल्काराज याला उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. 2019 मधील पाठदुखीच्या शस्त्रक्रियेतून सावरलेल्या व्हासेक पॉस्पीसील याला पुनरागमनाचा पुरस्कार देण्यात आला आहे. हा कॕनेडीयन खेळाडू गेल्या वर्षी 150 व्या स्थानी घसरला होता पण आता यंदा त्याने 61 व्या स्थानापर्यंत प्रगति केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER