आधी लग्न ऑलिम्पिकचे की स्वतःचे- अतानू व दीपिकाला पडला प्रश्न

Atanu and Dipika marriage postponement due to olympic

कोरोनाने लोकांचे आयुष्य किती वेगवेगळ्या प्रकारे प्रभावीत केले आहे याच्या अनेक हृदयस्पर्शी गोष्टी समोर येत आहेत. अशीच एक गोष्ट क्रीडाक्षेत्रातूनही समोर आली आहे. ती अशी की भारताचे आंतरराष्ट्रीय तिरंदाज अतानू दास व दीपिका कुमारी हे ‘लव्ह बर्डस्’ आहेत हे आता जगजाहीर आहे. त्यांचा साखरपुडासुध्दा झाला आहे. हे दोघे टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत आणि टोकियो 2020 नंतर ते विवाहबध्द होणार होते पण आता टोकियो ऑलिम्पिकच 2021 पर्यंत पुढे ढकलले आहे. त्यामुळे आता विवाह ऑलिम्पिकच्या आधी करावा की आॕलिम्पिक नंतर, असा प्रश्न त्यांना पडला आहे.

या विचित्र परिस्थितीबद्दल अतानू सांगतो की, मूळ विचार असा होता की ऑलिम्पिकच्या तयारीवर लक्ष केंद्रीत करता यावे यासाठी टोकियो 2020 नंतरच विवाहबध्द होण्याचा विचार होता पण आता ऑलिम्पिकच पुढे ढकलल्याने आम्ही या निर्णयाचा फेरविचार करत आहोत. दोन वर्षांपासून आम्ही लग्नासाठी थांबलो आहोत. त्यामुळे आता कोरोनाचे संकट निवळले की बहुतेक यंदाच आम्ही विवाहबध्द होऊ.

अलीकडेच हे दोघे ऑलिम्पिकच्या सरावासाठी पुणे येथे आर्मी इन्स्टिट्युट आॕफ स्पोर्टस् येथे राष्ट्रीय शिबिरात होते. पण कोरोनाच्या आपत्तीमुळे हे सराव शिबीर मध्येच गुंडाळण्यात आले आणि केवळ सुदैवानेच परतीची फ्लाईट मिळाल्याने ते पुण्याहून कोलकाता येथे घरी वेळेच परतू शकले होते. नाहीतर ते पुण्यातच अडकून पडले असते.

या दोघांनीही टोकियो ऑलिम्पिकसाठी आधीच पात्रता गाठली आहे. अतानू, तरुणदीप राय आणि प्रवीण जाधव यांचा पुरुष संघ तर दीपिका ही आशियाई पात्रता स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून वैयक्तिक गटात पात्र ठरली आहे. आता ऑलिम्पिक पुढे ढकलले गेल्याने आम्हाला वेळेचे अनमोल गिफ्ट मिळाले आहे असे अतानू म्हणतो.

दीपिका कुमारी ही सध्या जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असून एकावेळी ती पहिल्या स्थानी होती. 2010 च्या राष्ट्रकूल सामन्यांमध्ये तिने दोन सुवर्णपदक जिंकली असून विश्वचषक स्पर्धेतही पाच सुवर्णपदकं जिंकलीआहेत. 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्येही ती खेळली होती. तर अतानू दास हा 2016 च्या रियो आॕलिम्पिकमध्ये खेळला आहे. त्याने विश्वचषक स्पर्धेत दोन रौप्य आणि दोन कास्यपदके जिंकली आहेत.

ऑलिम्पिकबद्दल अतानू सांगतो की, रियो ऑलिम्पिक नंतर मला समजले की मनस्थिती चांगली ठेवणे आमच्या खेळात किती महत्त्वाचे आहे. आत्मविश्वास, एकाग्रता आणि उत्सुकता यावरच आमचा खेळ आहे. पदक जिंकण्यात व हरण्यात फारच थोडे अंतर असते. रियोत मी चांगली कामगिरी करत होतो पण केवळ चांगली कामगिरी पदक जिंकण्यासाठी पुरेशी नव्हती. रियो ऑलिम्पिकच्या प्रीक्वार्टर फायनलमध्ये तो शेवटपर्यंत लढून तो पराभूत झाला.

अतानू व दीपिका यांची पहिली भेट जमशेदपूर येथील टाटा आर्चरी ऑकेडमी येथे 2008 मध्ये झाली. दीपिका तेथेच 2006 पासून प्रशिक्षण घेत होती आणि अतानू तेथे आल्यावर या दोघांचीही लवकरच चांगली मैत्री झाली. आम्ही आता एवढ्या दिवसांपासून एकमेकांना ओळखतो की आमचे मैत्रीचे बंध अधिकच घट्ट झाले आहेत आणि आम्ही दोघे एकमेकांसोबत अधिक सुरक्षित अनुभव करतो. तीन वर्षांपासून आमची मैत्री प्रेमात बदलली पण आम्ही सहकारी तिरंदाज आणि इतरांपासून ते लपवून ठेवले. डिसेंबर 2018 मध्ये आमचा साखरपुडा झाला तेंव्हाच आमचे हे प्रेमप्रकरण सर्वांना माहित झाले.

आपल्या विवाहाचे नियोजन केले होते तसेच त्यांनी साखरपुड्याचेही असे नियोजन केले होते की ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत त्यामुळे कोणत्याही प्रकारचा व्यत्यत येऊ नये.

दीपिकाकडून मला खूप काही शिकायला मिळाले. करना है तो करना है ही तिची निश्चयी वृत्ती मला आवडते. शारीरिक तंदुरुस्तीबाबत ती घेत असलेली काळजी आणि मेहनतसुध्दा वाखाणण्याजोगी आहे.

आता मोकळ्या जागी सराव बंद झाल्यावर त्यांनी योग व ध्यानधारणेवर भर दिला आहे.