वाजले की बाराने चढला हळदीचा रंग

Siddhart chandekar & Maithali mayekar

सध्या सेलिब्रिटींच्या लग्नाची धामधूम सुरू आहे हे तर आपण पाहतच आहोत. गेल्या दोन तीन महिन्यांमध्ये मराठी टीव्ही सिनेमा इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी त्यांच्या आयुष्याचा जोडीदार शोधत एका नव्या पर्वाला सुरुवात केली आहे. याच लग्नसराईमध्ये गेल्या दोन वर्षांपासून ज्या जोडीचं नाव चर्चेत होतं ती म्हणजे मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांची जोडी. अखेर त्यांच्या लग्नाचा क्षण येऊन ठेपला आहे. त्याची झलक नुकतीच या दोघांच्या चाहत्यांना पाहायला मिळाली, अर्थातच त्यांच्या सोशल मीडिया पेजवर. सिद्धार्थ आणि मिताली यांचा हळद समारंभ अत्यंत जोशात झाला असून या कार्यक्रमात ‘मला जाऊद्याना घरी आता वाजले की बारा’ या गाण्यावर धमाल डान्स करत हळदीचा रंग चांगलाच चढवला.

सिद्धार्थ आणि मिताली यांच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. दोन वर्षांपूर्वी या दोघांची एका अॅवॉर्ड फंक्शनमध्ये ओळख झाली आणि त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. गेल्या वर्षीच्या जानेवारीमध्ये या दोघांचा साखरपुडा झाला होता. खरंतर गेल्याच वर्षी ते लग्नाचा बार उडवून देणार होते मात्र कोरोनामुळे त्यांनी मुहूर्त थोडा पुढे ढकलला. आता ज्या दिवशी म्हणजे 24 जानेवारीला ते पहिल्यांदा भेटले तोच दिवस त्यांनी लग्नासाठी निवडला असल्यामुळे सध्या चांदेकर आणि मयेकर कुटुंबांची लगीन घाई जोरात सुरू आहे. पुण्याजवळील एका वाड्यामध्ये या दोघांच्या लग्नाचा सोहळा होणार असल्याने दोन दिवसापूर्वी सिद्धार्थ आणि मिताली मुंबईहून पुण्याला पोहोचले. हळदी, संगीत आणि लग्न असे सर्व कार्यक्रम या डेस्टिनेशन वेडिंगमध्ये होणार आहेत.

त्या पूर्वी सिद्धार्थच्या घरी पुण्याला त्याचे सोडमुंज आणि ग्रहमख हे लग्नपूर्व विधी झाले. त्याचे फोटो सिद्धार्थने शेअर केले होते. सिद्धार्थ आणि मितालीच्या हळदीचा व्हिडिओ या यातून या जोडप्याची लग्न घटिका समीप आल्याचा माहोल रंगला आहे. हळदीसाठी या दोघांनी,” मला जाऊद्याना घरी आता वाजले की बारा” या गाण्यावर डान्स केला आणि तो व्हिडिओ त्यांनी व्हायरल केला आहे. या व्हिडिओसोबत मितालीने “घोडामैदान लांब नाही” अशी कॅप्शन देत या दोघांचीही एक्साइटमेंट किती जास्त आहे हेच दाखवून दिले आहे. दोघांनीही पांढरीशुभ्र कुर्ते घातले असून हळद लागलेल्या लूकमध्ये या दोघांचा वाजले की बारा च्या ठेक्यावरचा डान्स प्रचंड व्हायरल होत आहे.

खरंतर सध्या मिताली आणि सिद्धार्थ हे त्यांच्या मालिकांमध्ये व्यस्त आहेत. त्यातून त्यांनी सुट्टी घेऊन लग्नासाठी पुणे गाठले आहे. मिताली सध्या लाडाची मी लेक गं या मालिकेत कस्तुरीची भूमिका साकारत आहे. तर सिद्धार्थ सांग तू आहेस का या मालिकेत स्वराज या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचला आहे. कुटुंबीय आणि मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत त्यांच्या लग्नाचे एकेक विधी सुरू झाले असून आपल्या सर्व चाहत्यांना आपल्या लग्नाचे फोटो व्हिडिओ पाहता यावेत म्हणून हे दोघेही त्यांच्या सोशल मीडिया पेजवरून चाहत्यांसाठी सर्व फोटो व्हिडिओ शेअर करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER