महाराष्ट्र लॉकडाऊनच्या वेशीवर; वडेट्टीवारांचे संकेत, लोकलच्या फेऱ्याही कमी होणार?

maharashtra Lockdown

नागपूर : महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या वेशीवर उभा ठाकला आहे. तसंच मुंबई लोकलच्या फेऱ्याही कमी करण्याबाबत विचार सुरु असल्याचं मोठं आणि महत्त्वाचे संकेत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar)यांनी दिले आहे.

महाराष्ट्रातली कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या ही चिंतेत भर टाकणारी आहे. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना सुरु आहेत. उपाययोजना सुरु असल्या तरी त्याचा परिणाम काय येईल, हे आज सांगता येत नसलं तरी महाराष्ट्र लॉकडाऊनच्या ( Maharashtra Lockdown) उंबरठ्यावर आहे, असं आपल्याला म्हणता येईल, असं मोठं विधान विजय वडेट्टीवार यांनी केलं.

आजच्या स्थितीत लॉकडाऊन कोणालाच परवडणारं नाही, अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे पण रुग्णांची संख्या वाढत चालली हे पण सत्य आहे. आणि हे गंभीर आहे. राज्यातील काही शहरात कडक निर्बंध घ्यावे लागतील, असं सांगत लॉकडाऊनचा सूचक इशारा मंत्री वडेट्टीवार यांनी दिला आहे.

विदर्भातील चार जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. महाराष्ट्रही कोरोनाच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे सरकार गंभीर असल्यानेच अधिवेशनचा कामकाजाचा कालावधी आठ दिवसांसाठी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत सर्वसामान्यांना लोकल सेवा सुरु केल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाल्याचं समोर आलं आहे. यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, मुंबईत कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालल्याने असल्याने मुंबईतील लोकल फेऱ्या कमी करण्याचा विचार सुरू आहे. लोकलमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. मुंबई लोकलमध्ये गर्दी कशी कमी होईल याचा विचार सुरु आहे. तसंच मुंबई लोकलच्या फेऱ्या कमी करण्याबाबत विचार सुरू असल्याची महत्त्वाची माहिती त्यांनी दिली.

मंत्री संजय राठोड यांच्यावर प्रश्न विचारला असता वडेट्टीवार यांनी थेट प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालणार नाही. पोहरादेवीच्या गर्दीला जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच विदर्भातील चार जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. मंगलकार्यालयांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच सिनेमागृहे बंद करण्याचा विचार सुरू आहे. विदर्भात एक बैठक घेऊन कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने काही कठोर निर्णय घेण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER