
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही मुंबईसह अनेक मोठ्या शहरात लोकांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संंख्याही झपाट्याने वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मुंबईसह राज्यासाठी मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. आज संध्याकाळीच याबाबतचे नवे दिशानिर्देश जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यात लॉकडाऊन लागू होणार की कठोर निर्बंध जाहीर होणार? याकडे संपूर्ण राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी ३ वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक होणार आहे. आज रविवार असूनही मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावल्याने त्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये आजही मार्केट आणि रस्त्यावर नागरिकांची गर्दी वाढत असल्याने सरकारकडून कठोर निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई आणि राज्यासाठी वेगवेगळे निर्णय घेतले जाऊ शकतात. मुंबईत मिनी लॉकडाऊन आणि राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याबरोबरच त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांना लॉकडाऊन घेण्याचा अधिकार देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत होऊ शकतो. सत्ताधारी आघाडीतील मित्र पक्ष आणि विरोधी पक्षांचा लॉकडाऊनला असलेला विरोध पाहता राज्यात सरसकट लॉकडाऊन लावण्यात येणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला