‘निदान बाळासाहेबांचा तरी मान ठेवा’, फडणवीसांचा मुख्यमंत्री ठाकरेंना टोला

Balasaheb Thackeray - CM Uddhav Thackeray - Devendra Fadnavis

मुंबई :- ‘ही कोणती भूमिका आहे? मंदिर नाही, पण मदिरालय सुरू केल्या, निदान हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा थोडा तरी मान ठेवा. बदला, पण इतकेही बदलू नका, बाळासाहेबांच्या सुपुत्राकडून अशी अपेक्षा नव्हती’, अशा शेलक्या शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या धोरणांवर तीव्र आक्षेप नोंदवला. आमचे नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर आहेत. कोणीही घरी बसलेले नाही आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला. उद्धवजी तुमच्याकडनं अशी अपेक्षा नव्हती, इतके बदललात ? बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे तुम्ही सुपुत्र आहात, देव-देश-धर्माची लढाई तुम्ही विसरले आहात? हे लोकनियुक्त सरकार नाही, बेईमानानं आलेलं सरकार आहे, अशी जहरी टीका फडणवीस यांनी केली.

मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) आज राज्यभरात संताप आहे. पण राज्य सरकारकडून नुसता वेळकाढूपणा सुरू आहे. आपला नाकर्तेपणा लपविण्यासाठी पुन्हा भाजपवर आरोप केले जाताहेत. या सरकारकडे एकच काम आहे ते म्हणजे कुणी काही आरोप केला की महाराष्ट्रद्वेष म्हणायचे आणि भाजपवर टीका करून मोकळे व्हायचे. सरकारचे काम प्रश्न सोडविण्याचे असते याचे भान राज्यकर्त्यांना राहिलेले नाही, असे टीकास्त्रही फडणवीस यांनी सोडले. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही भाजपची भूमिका आहे. आंदोलन करणाऱ्यांना सुद्धा माझी विनंती आहे की, कायदेशीर मार्गाने आंदोलन करा. कायदा हातात घेऊ नका. महाराष्ट्र पेटलेला मी अनुभवला आहे, असे नमूद करत फडणवीस यांनी मराठा आंदोलकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले.

राज्यात बदल्यांचा धंदा सुरू आहे. राज्यात कोरोनाचा (Corona) धंदा सुरु आहे. कोविडचा बाजार मांडला आहे, भ्रष्टाचार सुरु आहे. म्हसन्या नावाच्या प्राण्याशी तुलना करायची का? असा टोलाही फडणवीस यांनी यावेळी लगावला. कुठे चाललाय महाराष्ट्र माझा? राज्यकर्त्यांनी उत्तर द्यावं, असं देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावलं. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तर महाराष्ट्र म्हणजे १२ कोटी जनता आहे.

यावेळी फडणवीसांनी थेट शरद पवारांवर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांचा माल बाजार समितीच्या मंडईतच विकला पाहिजे हे बंधन का?, असा माझा सवाल होता. अन्य कुठलाही उत्पादक कुठेही माल विकत असताना शेतकऱ्याला असं बंधन घालणं निश्चितच चुकीचं होतं, असं मी नव्हे, तर खुद्द शरद पवारांनीही म्हटलेलं असल्याचं सांगत फडणवीसांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. ज्यांना शेती समजते, १० वर्षं जे या देशाचे कृषिमंत्री होते. त्यांनीसुद्धा आधी कृषी विधेयकाला पाठिंबा दिल्याचं देवेंद्र फडणवीसांनी अधोरेखित केलं.

‘हाथरसचा (Hathras) निषेध प्रत्येकाने केलाच पाहिजे. पण महाराष्ट्रातील किती भगिनींबद्दल संवेदना दाखविली? कोविड सेंटरमध्ये बलात्कार आणि विनयभंग या नित्याच्याच घटना झाल्या आहेत. किती बलात्कार आणि विनयभंग झाल्यावर तुम्ही नियम तयार करणार ते तरी सांगा’, असा सवाल फडणवीस यांनी सरकारला केला.

ही बातमी पण वाचा : राज्यातील मंत्री हाथरसला गेले पण, गृहमंत्री शेजारच्या हिंगणघाटमध्ये जाऊ शकले नाही? – देवेंद्र फडणवीस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER