एक तरी व्हिडिओ कॉल हवा गं बाई

Ankita Panvelkar

गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाउनकाळात (Lockdown) व्हिडिओ कॉल, लाइव्ह सेशन्स या शब्दांना जरा जास्तच महत्त्व आलंय. माणसांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी होत नसल्याने मोबाइल प्रत्येकाच्या मदतीला धावून आला आणि आठवण आली की तडक व्हाटसअॅप व्हिडिओ कॉलच्या बटणाकडे बोट जायला लागलं. व्हिडिओ कॉलमुळेच अनेकजण जोडले गेले, संपर्कात राहिले. थोडक्यात काय तर कोरोनाकाळात (Corona) भेटण्याचा अनुभव देणाऱ्या व्हिडिओकॉलची चांगलीच चलती होती. आपल्या माणसांपासून, मित्रपरिवारापासून लांब जायला कुणालाच आवडत नसतं. मग ते आपल्या छोट्या पडदयावरच बाळूमामा आणि त्यांची माय सुंदराबाई यांना तरी कसं आवडेल बरं. मालिकेतून जरी सुंदराबाई वैकुंठाच्या प्रवासाला गेल्या असल्या तरी प्रत्यक्षात सुंदराची भूमिका करणारी अंकिता पनवेलकर (Ankita Panvelkar) तिच्या घरी पुणे मुक्कामी आहे. पण गेली दोन अडीच वर्षे ज्यांच्यासोबत मालिकेच्या निमित्ताने दिवसाचे बारा बारा तास घालवले त्यांची आठवण काही जात नाही. म्हणूनच पडद्यावरच्या या मायलेकरांचा दिवसातून एकदा तरी व्हिडिओकॉल करायचाच असा शिरस्ता आहे.

आदमापूर येथील संत बाळूमामा यांच्या आख्यायिकेवर बाळूमामाच्या नावानं चांगभलं ही मालिका छोट्या पडदयावर आली आणि काही दिवसातच लोकप्रिय झाली. बाळूमामांवर श्रद्धा असलेल्या अनेक भक्तांना त्यांचा प्रवास दाखवत ही मालिका सुरू आहे. अभिनेत्री अंकिता पनववेलकर ही बाळूमामांच्या आईची म्हणजे सुंदराबाईची भूमिका करत होती. धनगर समाजातील सुंदरा हे पात्र साकारताना त्या काळातील भाषा, वेशभूषा, राहणीमान याचा विशेष अभ्यास करून अंकिताने ही भूमिका इतकी छान साकारली की मालिकेत जेव्हा सुंदराचा मृत्यू होतो आणि आता ती कधीच दिसणार नाही हे स्पष्ट झाले तेव्हा तिच्या चाहत्यानाही वाईट वाटले. याबाबत एक प्रतिक्रिया आल्याचे सांगताना अंकिता म्हणाली, की मला एक असा मेसेज आला की त्यामध्ये म्हटले होते की तुम्ही तुमच्या मालिकेच्या लेखकांना असं काहीतरी सांगा की तुमचे पात्र पुन्हा मालिकेत येईल. किंवा जुन्या आठवणींवर काही भाग दाखवा ज्यामुळे तुम्ही अजून या मालिकेत दिसाल. मालिकेतील भूमिका संपल्यानंतरही प्रेक्षकांना आपण मालिकेत असावं असं वाटतं ही प्रतिक्रिया खूप मोलाची आहे असंही अंकिताने यावेळी सांगितलं.

बाळूमामा आणि सुंदराबाई यांच्यात खूप छान नातं होतं. वडील मायाप्पा यांच्यापेक्षा बाळूमामा त्यांच्या आई सुंदराबाईंशी जास्त जवळीक होती. आपल्या मुलामध्ये असलेल्या विशिष्ट शक्तीची जाणीव आणि आदर सुंदराला होता. याविषयी अनेक सीन या मालिकेत दाखवण्यात आले असल्याने बाळूमामांची भूमिका करणारा सुमित पुसावळे आणि सुंदराचे पात्र रेखाटणारी अंकिता पनवेलकर यांच्यातही ऑफस्क्रीन खूप छान मैत्री झाली. त्यामुळेच जेव्हा सुंदराच्या मृत्यूनंतर अंकिताचाही मालिकेतील ट्रॅक संपला. या मालिकेतील अंकितावर चित्रीत होणाऱ्या शेवटच्या सीनमध्ये ती विठोबाच्या मूर्तीसमोर उभी राहून नमस्कार करत आता हा माझा शेवटचा नमस्कार म्हणत रडते असा सीन होता. या सीनमध्ये अंकिताच्या डोळ्यातून खरोखरच पाणी वाहायला लागले. इतकेच नव्हे तर या सीनमध्ये बाळूमामा तळावर असल्याने तो घरात नसतो. पण सेटवर सुमित हजर होता. अंकितासारखी मैत्रीण आता रोज भेटणार नाही हा विचार मनात आल्यानंतर त्यालाही रडू आवरेना झाले. अंकिताचे पॅकअप झाल्यानंतर मात्र सुमित आणि अंकिताने एक मार्ग काढला आणि रोज आपण व्हिडिओ कॉल करून भरपूर गप्पा मारायच्या असं प्रॉमिस केलं.

अंकिताची या मालिकेतून एक्झिट होउन दोन आठवडे झाले. बाळूमामांना त्यांची माय आठवते असे काही सीन त्यानंतर मालिकेत दिसले. तसेच मायाप्पालाही सुंदरासोबतचे क्षण आठवत असल्याचा फ्लॅशबॅक ऑनस्क्रीन दिसला. पण ठरल्याप्रमाणे सुमित आणि अंकिता रोज व्हिडिओकॉल करून गप्पा मारतात. सेटवरच्या मजा सांगून सुमित अंकिताला भंडावून सोडतो. यानिमित्ताने अंकिताही मनाने बाळूमामा मालिकेच्या सेटवर फिरून येते.

अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेत अंकिताने जुईच्या मैत्रीणीची भूमिका साकारली होती. पण सुंदराच्या भूमिकेने तिला ओळख मिळवून दिली. ही भूमिका स्वीकारताना तिच्या मनाचा खूप गोंधळ झाला होता. अंकिताने आईची भूमिका स्वीकारू नये असा सल्लाही तिला मिळाला होता. शिवाय तिच्या खऱ्या वयापेक्षा सुंदरा खूप मोठी होती. तसेच नऊवारी साडी, मोठं कुंकू. केसांचा आंबाडा यामुळे ती पडद्यावर पोक्त रूपात दिसणार होती. पण सुंदराच्या दिसण्यापेक्षा अभिनयातून या व्यक्तिरेखेचं रूप खुलवण्यात अंकिता यशस्वी झाली आणि तिचं या मालिकेशी कायमचं नातं जडलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER