तुरट रस – जीभेला जड करणारा !

Ayurveda

षड रसांपैकी तुरट किंवा कषाय हा एक रस. तुरट रस असणारे आहारात उपयोगात येणारे पदार्थ कमीच असतात. तुरट रसाच्या वनस्पती औषधी प्रयोगार्थ बऱ्याच आहेत. अवस्था किंवा रोगांच्या लक्षणानुसार कषाय रसाच्या वनस्पती वापरण्यात येतात. पण जसे की म्हटले आहे की सहा रस आहारात असणे महत्त्वाचे म्हणूनच कषाय किंवा तुरट रसाचेही महत्त्व आहेच की!

कषाय रस जीभ स्वच्छ करणारा, जीभेला जडपणा आणणारा आहे. आयुर्वेदात कषाय रसाचे गुण सांगितले आहेत. कषाय रस मुख्यत: शरीरात स्तंभन म्हणजेच प्रवाह थांबविण्याचे काम करतो. उदा. जखम झाली असेल तर रक्त थांबविण्याचे कार्य तुरट रसाची औषधे करतात. उदा. अर्जुन, तुरटी

जखम असेल किंवा त्वचा विकार असतील त्यात पूय तयार होत असेल व पू वाहत असेल तर जखम आतून भरून आणणे तसेच पू निर्माण न होणे असे कार्य तुरट रस असणारे द्रव्य करतात.

कषाय रस कफपित्त दोषांचे शमन करणारा आहे.

व्रण ठीक करणारे असल्यामुळे तोंडाला फोड होणे किंवा जिभेला छाले होत असल्यास कषाय वा तुरट रस असणारे द्रव्ययुक्त काढ्याने गुळण्या केल्यास पित्त पण कमी होते तसेच फोड अथवा छाले लवकर भरून येतात. उदा. खदीर (खैर) किंवा मध.

त्वचा स्वच्छ करणारा हा तुरट रस आहे. म्हणूनच अति स्निग्ध तैलीय त्वचा असेल तर तुरट रसाच्या औषधांनी चेहरा धुतल्यास जास्तीची स्निग्धता कमी होते.

तुरट रस पातळ मळाला घट्ट करण्याचे काम करतो. बेलाचा गर किंवा मुरब्बा पातळ संडास किंवा चिकट कफ मल होत असेल तर देतात. बेल तुरट रसाचे असल्यामुळे हे कार्य घडते.

हे सर्व तुरट रसाचे गुण आजार झाल्यास उपयोगी पडतात.

अति प्रमाणात तुरट रसाचे सेवन झाले तर तोंड कोरड पडणे पोट फुगणे, घसा बसणे, त्वचा काळवंडणे, पुरुषत्व कमी होणे, रक्त वाहिन्यांचा संकोच होणे, अति तहान लागणे हे विकार उत्पन्न होतात. सुपारी तंबाखु कॉफी चहा यांचे अति सेवन करणाऱ्यांना हा त्रास होतो हे आपण बघितले असेल. या सर्व गोष्टी तुरट रसाच्या असतात. जांभूळ, कवठ हिरडा बेहडा मध कच्चे खजूर हे कषाय रसाचे असतात. आहारात सर्व डाळी सुद्धा गोड तुरट अशाच असतात त्यामुळे विशेष प्रयत्न तुरट रस घेण्यासाठी करावा लागत नाही. अति प्रमाणात तुरट रसाचे सेवन पण होत नाही. असा हा कषाय वा तुरट रस कफपित्तशमन करणारा पण वात वृद्धी करणारा !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER