आस्ताद आणि शेपूची भाजी

astad kale swapnali patil

काही भाज्यांवर नावडती भाजी असा शिक्का बसलेला असतो की काय कोणास ठाऊक ? ती समोर आली कि हमखास नाक मुरडलं जातं. अशा भाजांच्या यादीत सगळ्यात वरच्या क्रमांकावर शेपूची भाजी असते. शंभरातल्या नव्त्यांणव जणांना विचारले तर त्याचं उत्तर शेपूची भाजी आवडत नाही असंच असेल. याच यादीत अभिनेता आस्ताद काळे (Astad Kale) हा देखील होता पण स्वप्नाली त्याच्या आयुष्यात केवळ प्रेमच घेऊन आलेली नाही तर शेपूच्या भाजी विषयीदेखील त्याचं प्रेम घेऊन आली आहे. स्वप्नाली भेटेपर्यंत शेपूच्या भाजीकडे ढुंकूनही न बघणारा आस्ताद आता आठवड्यातून एकदा तरी स्वप्नालीकडून शेपूची भाजी बनवून घेतो. हा बदल कसा झाला यालाही स्वप्नालीचं पाककौशल्य कारणीभूत आहे. आस्तादच्या शब्दात सांगायचं तर स्वप्नाली अशी काय झक्कास शेपूची भाजी करते की इतके दिवस मी ही भाजी का खाल्ली नाही हा प्रश्न मला सतावतो.

आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील यांचं नुकतच लग्न झालं. गेल्या अनेक दिवसांपासून या जोडीच्या लग्नाची चर्चा सुरू होती. एकीकडे सेलिब्रिटी कलाकारांच्या लग्नाचा धुमधडाका सुरू असताना आस्ताद आणि स्वप्नालीने मात्र “आम्ही दोघं एकमेकांच्या पती-पत्नी म्हणून स्वीकार करतो” ही शपथ घेत आणि विवाह प्रमाणपत्रावर सही करत लग्न केलं. त्यांच्या लग्नाच्या फोटोवर अजूनही सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस पडत आहे. स्वप्नाली आयुष्यात आल्याने खूप बदल झाल्याचं आस्ताद सांगतो. त्यापैकीच एक बदल म्हणजे मला शेपूची भाजी खूप आवडायला लागली.

आस्ताद आणि स्वप्नाली गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. लग्न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यानंतर त्यांचं लग्न झालं या काळात त्यांनी एकमेकांच्या खूप आवडीनिवडी आणि स्वभाव वैशिष्ट्य यांचीही सवय करून घेतली. आस्ताद सांगतो, माझे आई बाबा दोघेही नोकरी करत असल्यामुळे, स्पेशली आई नोकरी करत असल्यामुळे आमच्याकडे काही भाज्या बनवल्या जात नव्हत्या. आई-बाबा रोज सकाळी डबा घेऊन जायचे आणि मीपण शाळेत डबा घेऊन जायचो त्यामुळे डब्याची भाजी म्हणून आपल्या घरात ज्या भाज्या केल्या जातात त्यामध्ये शेपूची भाजी कधीच नसायची. आई ऑफिसमधून घरी दमून यायची त्यामुळे ज्या पालेभाज्या बनवल्या जायच्या त्यातही मेथी, पालक याच भाज्या असायच्या. शेपूच्या भाजीच्या तो उग्र वास मला आवडायचा नाही म्हणून मग आई कधी ती भाजीच करायची नाही. याचा परिणाम असा झाला की मला शेपूची भाजी आवडेना झाली.

मात्र एकदा स्वप्नालीने शेपूची भाजी केली आणि मला न सांगता तिने माझ्या पानात वाढली. शेपूची भाजी कशी लागते हेच माहीत नव्हतं फक्त तिचा वास मला आवडायचा नाही पण मी स्वप्नालीने केलेली शेपूची भाजी खाल्ली आणि अवाक झालो. आणि त्या दिवसापासून मी शेपूची भाजी खायला लागलो इतकच नव्हे तर मला ती आठवड्यातून एकदा माझ्या जेवणात हवीच असं वाटायला लागलं. हा सगळा बदल स्वप्नालीमुळे झाला हे काही खोटं नाही. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते आणि आपल्या सवयी, आपल्या आवडीनिवडी सहजपणे बदलायला लागतात याची खऱ्या अर्थाने मी प्रचिती घेतली. आमच्या नात्यांमध्ये थोडं तुझं थोडं माझं असं करत आम्ही एकत्र आलो.

आस्ताद आणि स्वप्नाली यांनी पुढचं पाऊल या मालिकेत एकत्र काम केलं होतं. या मालिकेच्या दरम्यान आस्तादला स्वप्नाली आवडायला लागली. मात्र स्वप्नालीबरोबरच नातं जगजाहीर करायला बिग बॉस हा शो पडद्यावर यायची वाट पहावी लागली. त्यानंतर हे दोघं खऱ्या अर्थाने कपल म्हणून एकत्र आले.

आस्ताद सध्या चंद्र आहे साक्षीला या मालिकेत संग्रामची भूमिका करत आहे. त्याशिवाय नुकताच काही दिवसापूर्वी त्याने सिंगिंग स्टार या रियालिटी शोमध्ये दुसरा क्रमांक पटकावत त्याचं गाण्याचं कौशल्यही प्रेक्षकांसमोर सादर केलं. आस्ताद स्वभावाने खूप रागीट आहे. त्याला एखाद्या गोष्टीबद्दल पटकन राग येतो. अर्थात हे स्वप्नालीला माहित आहे आणि म्हणूनच स्वप्नालीने लग्नात आस्तादच्या या रागीट स्वभावावरच उखाणा घेत उपस्थितांना चांगलंच हसवलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER