नागपुरचे विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासाविना चालणार?

नागपूर :- महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनाची सुरुवात येत्या 16 डिसेंबरपासून होत आहे. मात्र यावेळी प्रश्नोत्तराचा तास राहणार नाही. विधिमंडळ सचिवालयाने देखील याबाबत संकेत दिले आहेत. कारण प्रश्नोत्तराच्या तासासाठी आमदारांकडून प्रश्न मागवणे, त्यावर विविध विभागांमध्ये काम, विधिमंडळ सचिवालयास त्यावर प्रक्रिया करण्यासाठी लागणारा कालावधी अशा विविध प्रक्रियांसाठी कालावधीच शिल्लक नसल्याने हा तासच नसणार असे समजते.

आमदारांना मतदारसंघातील प्रश्न उपस्थित करून तो सोडवून घेण्याची संधी मिळत असते. यासाठी विधानसभा व परिषदेत प्रश्नोत्तरांच्या तासांना महत्त्व आहे. यानिमित्ताने त्यासाठी महिनाभर अगोदर आमदारांकडून सचिवालयाकडे प्रश्न टाकले जातात. मात्र, सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे ही प्रक्रियाच सुरू होऊ शकली नाही. दुसरीकडे मंत्रिमंडळाच्या विस्तार केव्हा यावरही प्रश्नचिन्ह लागले अस्ून महाविकास आघाडीचे मंत्रीही अद्याप खात्याविना आहेत.

महत्त्वाचे म्हणजे अधिवेशनाला दहा दिवसांचा कालावधी शिल्लक असताना आता ही प्रक्रिया राबवणे शक्य नसल्याचे विधिमंडळ सचिवालयातील सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळेच प्रश्नोत्तराचा तास होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रश्नोत्तराचा तास होणार नसल्याचे शिवसनेचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्टच सांगितले आहे. तर विधिमंडळाचे प्रधान सचिव भागवत यांनी तशी शक्यता कमी असल्याचे सांगितले. येत्या दोन दिवसात होणाऱ्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होऊ शकते, असेही संकेत त्यांनी दिले.