विधानसभा निवडणूक: काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीकरीता 6 जुलैपर्यंत अर्ज मागविले

Ashok-Chavan

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच पक्षांनी कंबर कसली असून विधानसभेच्या तयारीसाठी पक्षांमध्ये महत्वाच्या बैठकी घेण्याचे सत्र सुरू आहे. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीकरीता 6 जुलैपर्यंत अर्ज पाठवता येणार असल्याचे काँग्रेस पक्षाने जाहिर केले आहे.

विविध पातळ्यांवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही नियोजनाला सुरूवात केली आहे. प्रदेशाध्यक्ष नियमितपणे विविध पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन नियोजनाचा आणि पूर्व तयारीचा आढावा घेत आहेत.
प्रदेश काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे लेखी अर्ज मागवले आहेत. इच्छुकांनी आपले अर्ज 6 जुलै 2019 पर्यंत ‘महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर पश्चिम, मुंबई’ येथे पाठवायचे आहेत. अशी माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर आता भाजपने पुढचे टार्गेट विधानसभा निवडणुकांचे ठेवले आहे. त्यासाठी पक्षात जोरदार तयारी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमिवर मुख्यमंत्र्यांकडून बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे.

सत्ताधारी भाजपने पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. भाजपच्या बैठकीत संघटनात्मक बांधणी, निवडणुकीचा अजेंडा आणि विरोधकांना शह देण्यासाठीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात येणार आहे.

दरम्यान, शिवसेना भवनात शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघातील संपर्कप्रमुख आणि सहसंपर्कप्रमुखांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या विजयासाठी उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोणीही असो, त्याच्या विजयासाठी महायुतीच्या सर्व पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे यासाठी हे मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती आहे.

नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांनी सामनातून मुख्यमंत्रीपदाबाबत जाहीर भाष्य केले होते. त्यामुळे शुक्रवारच्या बैठकीतही त्याचदृष्टीने अजेंडा ठरवला गेला का, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगत आहे.