विधानसभा निवडणूक : भाजपची २१ जुलैला महत्त्वपूर्ण बैठक

CM Fadnavis

मुंबई: येत्या ऑक्टोबर महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याचा लवकरच बिगुल वाजणार असून भाजपची विधानसभेची तयारी सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील गोरेगाव येथे असलेल्या नेस्को संकुलात २१ जुलै रोजी भाजपाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडेल.

या बैठकीत राज्यभरातील भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याचीही शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि भाजप युती झाली. युतीनं राज्यात घवघवीत यशदेखील मिळवलं. आता विधानसभेतही युती भक्कमपणे लढणार असल्याचे युतीच्या दोन्ही नेत्यांनी म्हटले आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढवणार असून २२० पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवू, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी केला होता. विधानसभा निवडणुकीत युतीला २२० पेक्षा अधिक जागांवर विजय मिळाल्यास आश्चर्य वाटू नये, असेही त्यांनी नमूद केले होते.

२०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढले होते. तरी भाजपला १२२ जागांवर तर शिवसेनेला ६३ जागांवर यश मिळाले होते. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही प्रभाव दिसणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही युती दमदार विजय खेचून आणणार यात शंका नाही, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला होता. २१ जुलै रोजी होणा-या बैठकीत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे आता राज्यातील भाजप नेत्यांचे लक्ष लागले आहे.