“मला तिकीट नाही तर किमान मुलाला किंवा बायकोला तरी द्या”, अशी मागणी करू नका- गडकरी

Nitin Gadkari

नागपूर :विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिकीट मागणारे वाढले असल्याचे सांगताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, भाजपमध्ये उमेदवारीच्या तिकिटासाठी कोटा सिस्टीम नाही. तिकीट कोणाला द्यायचे, हे पक्षच ठरवणार. पक्षाचे हित, जनतेचा विचार आणि कार्यकर्त्याचे काम पाहूनच तिकीट दिले जाणार. त्यामुळे ज्यांना तिकीट मिळेल, त्यांच्यामागे कार्यकर्त्यांनी ठामपणे उभे राहिले पाहिजे. त्यामुळे मला तिकीट मिळाले नाही तर किमान मुलाला अथवा बायकोला तिकीट द्या, अशी मागणी करू नका, या शब्दांत  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या.

तिकीट न मिळालेल्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा मोठा अनुभव आपल्याकडे असल्याचे सांगताना नितीन गडकरी म्हणाले, पक्षात आज माझ्यापेक्षाही अधिक काम केलेले कार्यकर्ते आहेत. पक्षात काहीच न मिळालेल्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. आज सर्वत्र भाजपची सत्ता आहे. त्याचे श्रेय पक्षासाठी खस्ता खाणाऱ्या कार्यकर्त्यांना आहे, असेही गडकरी यावेळी म्हणाले.

भाजपच्या विदर्भ प्रदेश विजय संकल्प मेळाव्यातील भाषणात गडकरी यांनी प्रामुख्याने तिकिटेच्छुक  कार्यकर्त्यांच्या प्रवृत्तीवर भाष्य करताना सभागृहात हास्यकल्लोळ उडाला.

युती होईल असे वाटते
भाजप-शिवसेना युतीवरून राजकीय वातावरण तापलेले असताना गडकरी यांनी उपरोधिक स्वरात ‘युती होईल असे वाटते,’ असे सांगितल्यावर सभागृह हास्यकल्लोळात बुडाले. गडकरी यांना नेमके काय म्हणायचे होते, यावरून नंतर कार्यकर्त्यांमध्ये बरीच चर्चा होती.

आता शेवटचे तरी तिकीट द्या
तिकीट मागतेवेळी साहेब शेवटचे तिकीट द्या, अशी विनवणी कार्यकर्ते करतात. नंतर दुस-यावेळी पुन्बा तिकीट मागायला तयार होतात. मला नाही तर किमान मुलाल किंवा बायकोला तिकीटाची मागणी करतात. परंतू भाजपमध्ये असे होत नाही. समझनेवाले को इशारा काफी है, असे गडकरी म्हणाले.