भाजपचे ‘शॉपिंग’, दोन्ही काँग्रेस रिकामे होणार

chandrakant patil and balasaheb thorat

badgeमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमचे सध्या जोरदार ‘शॉपिंग’ सुरू आहे. विधानसभा निवडणुकीला तीन महिन्यांपेक्षा कमी काळ उरला असताना दोन्ही काँग्रेस पक्ष रिकामे करण्याचा एकसूत्री कार्यक्रम भाजपने हाती घेतलेला दिसतो. प्रदेश भाजपचे नवे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील तर बाहेरच्यांना आणायला उतावीळ दिसतात. आल्या आल्या दादा गौप्यस्फोट करत सुटले आहेत. परवा त्यांनी नवे कार्याध्यक्ष सत्यजित कदम यांच्या दिशेने इशारा केला. आज ‘अनेक आमदार ह्या आठवड्यात येत आहेत’ असे दादा म्हणाले. एवढ्या खात्रीने दादा बोलतात म्हणजे काहीतरी गडबड असली पाहिजे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ४२ तर राष्ट्रवादीचे ४१ आमदार निवडून आले होते. बरीचशी फोडफाड झाली आहे. आणखी १० ते १५ आमदार युतीमध्ये येतील. पुन्हा निवडून येण्याची शक्यता असलेलेच आमदार मुख्यमंत्री उचलत आहेत. हीच स्पीड राहिली तर ऑक्टोबरमध्ये दोन्ही काँग्रेसमध्ये कचरा शिल्लक असेल.

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आघाडीचे आमदार खचले आहेत. आपण निवडून येऊ याचा विश्वास त्यांनी गमावला आहे. सध्याची पळापळ दिसते ती त्यामुळे. पडण्यासाठी कोण लढेल? सर्वांत गंभीर म्हणजे काँग्रेसच्या कुण्या नेत्यामध्ये ही पळापळ थांबवण्याची इच्छाशक्ती दिसत नाही. हे केवळ महाराष्ट्रात सुरू आहे असे नाही. कर्नाटक, गोवामध्ये हेच सुरू आहे. आणि लवकरच त्याची लागण मध्य प्रदेश आणि राजस्थान इथेही झालेली पाहायला मिळेल. तेवढा वजनदार नेता आता काँग्रेसमध्ये उरला नाही.

दुसऱ्या तिसऱ्या फळीचे नेते उरले आहेत. त्यांना स्वतःचाच मतदारसंघ टिकवण्याची मारामार आहे. तिथे इतरांसाठी नसती उठाठेव कशाला करतील? बाळासाहेब थोरात यांच्या रूपाने नवा अध्यक्ष मिळाल्यानंतरही पळापळीच्या बातम्या थांबायचे नाव घेत नाहीत याचा अर्थ स्पष्ट आहे. थोरात यांच्यात धडाडी नाही. युतीला टक्कर द्यायची म्हणजे ते एक प्रकारचे युद्धच आहे. थोरात युद्ध करू शकत नाहीत. ते त्यांच्या प्रकृतीत नाही. शरद पवार युतीचे आक्रमण रोखू शकतात; पण तेही मौनात गेलेले दिसतात. त्यामुळे दोन्ही काँग्रेस कोमात गेल्यासारखी परिस्थिती आहे. युतीच्या नेत्यांनी फोडाफोडीचा सपाटा लावला आहे; पण इतक्या आमदारांना घेऊन काय लोणचे घालणार आहेत? ते तिकिटासाठी येत आहेत. भाजप फार फार तर बाहेरच्या १५-२० आमदारांना तिकीट देऊ शकतो. आणखी १०-१२ आमदारांना शिवसेनेत पाठवून तिकडून तिकिटाची सोय करू शकतो. त्यापेक्षा जास्तीची सोय कठीण आहे.

गेल्या निवडणुकीत भाजपचे १२२ आणि शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आले होते. ह्यातल्या बहुतेकांना तिकीट द्यावेच लागणार आहे. ५-२५ आमदारांचे तिकीट कापायचे म्हणजे गंमत नाही. भाजपने खूप कापाकापी केली तर त्याची उलट प्रतिक्रिया होऊ शकते. युतीतले निष्ठावंत बंड करतील. मग आऊटगोइंग सुरू होईल. युतीतल्या संभाव्य बंडावर शरद पवार नजर ठेवून आहेत का?