विदर्भात १८ तगडे बंडखोर रिंगणात

badgeविदर्भात बंडखोरांना बसवण्याच्या श्रेष्ठींच्या प्रयत्नांना विशेष यश मिळाले नाही. त्यामुळे चारही प्रमुख राजकीय पक्षांसमोर अनेक जागी बंडखोरांनी मोठे आव्हान निर्माण केले आहे. विदर्भातल्या एकूण ६२ जागांमध्ये तब्बल १८ प्रमुख बंडखोर रिंगणात कायम आहेत. त्यामुळे मतविभाजनात काही जागी निकाल बदलण्याच्या चिंतेने संबंधितांचे टेन्शन वाढले आहे. एकूण ७५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत. मतदानाला अजून १४ दिवस आहेत. ह्या काळात आपली हवा बनवण्याची धडपड बंडखोरांनी चालवली आहे.

ही बातमी पण वाचा:-  सरसंघचालकांनी केले मोदी सरकारचे कौतुक 

नागपूर जिल्ह्यातील रामटेकमध्ये माजी आमदार शिवसेनेचे नेते आशिष जयस्वाल यांनी तलवार उपसली आहे. गोंदिया जिल्ह्यातील चारही मतदारसंघात बंडखोरी आहे. पाच टर्म आमदार राहिलेले कॉंग्रेसचे गोपाल अग्रवाल यांनी यावेळी भाजपची उमेदवारी मिळवली खरी. पण भाजपचेच काही लोक त्यांच्याविरुध्द सक्रीय झालेले आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपकडून लढलेले विनोद अग्रवाल यावेळी बंडखोर म्हणून मैदानात आहेत. तिरोड्यात राष्ट्रवादीत तर आमगावमध्ये कॉंग्रेसमध्ये बंडखोरी आहे. अर्जुनी मोरगावमध्ये बंडखोरी नाही. तिथे माजी मंत्री भाजपचे राजकुमार बडोले हे राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे यांना टक्कर देत आहेत. भंडारा जिल्ह्यात तुमसर मतदारसंघात भाजपचे आमदार चरण वाघमारे यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी बंड केल्याने भाजपची चिंता वाढली आहे. भंडारा इथली जागा युतीने आठवले गटाला आणि आघाडीने पिरीपाला सोडल्याने बंडाळी आहे. साकोलीत कॉंग्रेसचे बंडखोर माजी आमदार सेवक वाघाये वंचित बहुजन आघाडीकडून लढत असल्याने कॉंग्रेसचे हेविवेट नाना पटोले यांची अडचण वाढली आहे. इथे भाजपचे परिणय फुके आणि पटोले यांच्या सरळ टक्कर आहे.

अर्थमंत्री सुधीर मुंगणटीवार लढत असलेल्या चन्द्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरमध्ये बंडखोरी नाही. मात्र चंद्रपुरमध्ये कॉंग्रेसमध्ये बंडखोरी झाल्याने भाजपचे नाना शामकुळे यांचे फावले आहे. वरोरा मतदारसंघात शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये येऊन खासदार झालेले बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा लढत आहेत. नुकतेच भाजपमधून शिवसेनेत आलेले माजी मंत्री संजय देवतळे आणि अपक्ष डॉ. विजय देवतळे ह्या भावंडांच्या लढाईत धानोरकर यांना दिलासा मिळताना दिसतो आहे. राजुरा येथे भाजपचे संजय धोटे, कॉंग्रेसचे सुभाष धोटे आणि माजी आमदार वामनराव चटप यांच्यात तुल्यबळ लढत आहे. ब्रम्हपुरी येथे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात शिवसेनेने माजी मंत्री वामनराव गड्डमवार यांच्या मुलाला उतरवले आहे. पारोमिता गोस्वामी ह्या झुंजार नेत्या आम आदमी पक्षाकडून मैदानात असल्याने इथे काहीही होऊ शकते.

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे आघाडीत बिघाडी आहे. राष्ट्रवादीचे धर्मरावबाबा आत्राम आणि भाजपचे अंबरीश आत्राम ह्या काका-पुतण्यात सामना आहे. पण कॉंग्रेसचे दीपक आत्राम यांनी उडी घेतल्याने येथे काहीही होऊ शकते. अहेरीतल्या बिघाडीचा विदर्भातील काही लढतींवर परिणाम होऊ शकतो.

अमरावतीत भाजपचे डॉ. सुनील देशमुख आणि सुलभ खोडके यांच्यात थेट लढत आहे. बडनेरामध्ये शिवसेनेच्या प्रीती बंड आणि युवा स्वाभिमानी पक्षाचे रवी राणा लढत आहेत. मोर्शी येथे भाजपचे डॉ. अनिल बोंडे यांचा सामना आघाडीचे देवेंद्र भुयार यांच्याशी आहे. कॉंग्रेसच्या कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर तिवसामध्ये शिवसेनेशी झुंजत आहेत. अचलपूरमध्ये बच्चू कडू बहुरंगी लढतीत सापडले आहेत.

वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट येथे भाजपसमोर शिवसेनेच्या बंडखोराचे आव्हान आहे. देवळीत भाजपचा बंडखोर आहे. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे पाच जागी बंडखोरी आहे. यवतमाळमध्ये गेल्या निवडणुकीत अल्प मतांनी हरलेले संतोष ढवळे यावेळी भाजपचे मदन येरावार यांचा त्रास वाढवत आहेत. आर्णीमध्ये भाजपचे आमदार राजू तोडसाम यांची बंडखोरी आहे. दिग्रसमध्ये माजी मंत्री भाजपचे संजय देशमुख यांनी बंड केल्याने शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांची अडचण वाढली आहे.

बुलढाण्यात योगेंद्र गोडे यांच्या बंडखोरीमुळे कॉंग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ, शिवसेनेचे संजय गायकवाड आणि माजी आमदार वंचित आघाडीचे विजयराज शिंदे यांच्यात बहुरंगी लढत आहे. अकोला जिल्ह्यामध्ये पाचही मतदारसंघामध्ये बंडखोरी होती. पण अखेरच्या दिवशी सर्वच बंडखोरांनी माघार घेतली. बाळापुरमध्ये वंचितचे बळीराम सिरस्कार, अकोला पूर्वमध्ये माजी मंत्री दशरथ भांडे असे दिग्गज मैदानातून बाहेर गेले आहेत. अकोला जिल्ह्यातील वाशीममध्ये मात्र भाजपला डोकेदुखी आहे.