विदर्भाचे प्रवेशद्वारात प्रस्थापितांचा बोलबाल

विदर्भाचे प्रवेश द्वार असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेचा दबदबा कायम राहिल्याने विधानसभा निवडणुकीतही युतीला निश्चितपणे फायदा होईल असे सध्याचे चित्र आहे. या जिल्ह्यातील सातपैकी पाच जागा भाजप-शिवसेनेकडे तर दोन काँग्रेसकडे आहेत. मलकापूर, जळगाव जामोद, खामगावमध्ये भाजपाचे आमदार आहेत.

तर सिंदखेड राजा आणि मेहकरमध्ये शिवसेनेचे आमदार आहेत. चिखली आणि बुलढाणा या दोन जागा काँग्रेसकडे आहेत. निष्क्रिय  खासदार अशी प्रतिमा असूनही केवळ मोदी लाटेमुळे  शिवसेनेचे प्रतापराव जाधव पुन्हा एकदा लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा एक लाख 33 हजार मतांनी पराभव केला पण त्याच वेळी वंचित बहुजन आघाडीचे आ. बळीराम शिरस्कर यांनी तब्बल एक लाख 73 हजार मते घेतली हेही विसरता येणार नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीची मते  वंचित आघाडीने पळवली आणि प्रतापराव जाधव यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.

ही बातमी पण वाचा : उमेदवारीची खात्री नसल्याने विदर्भातील अनेक नेते भाजपला सोडचिठ्ठी देणार!

मतविभाजनाचा फायदा गेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपा शिवसेनेच्या उमेदवारांना या जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी झाला होता.यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत जाणार नाही असे चित्र असल्याने युतीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भाजप आपल्या तिन्ही आमदारांना पुन्हा उमेदवारी देईल असे चित्र आहे.

त्यात मलकापूरचे चैनसुख संचेती, जळगाव जामोद डॉ. संजय कुटे आणि खामगावचे आकाश फुंडकर यांचा समावेश आहे.

काँग्रेसतर्फे बुलढाणामध्ये विद्यमान आमदार हर्षवर्धन सपकाळ तर चिखलीमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान आमदार राहुल बोंद्रे यांना यांनाच पुन्हा उमेदवारी मिळेल हे सांगण्यासाठी राजकीय पंडिताची गरज नाही. दीर्घ कालावधीनंतर सिंदखेडराजाची जागा शिवसेनेकडे खेचून आणण्यात यश मिळवणारे डॉ. शशिकांत खेडेकर पुन्हा शिवसेनेचे उमेदवार असतील हे जवळपास नक्की आहे. मेकर मध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार राजेश रायमुलकर हे खासदार प्रतापराव जाधव यांच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा विधानसभेवर पोहोचण्यासाठी सज्जे आहेत एकंदरीत बुलढाणा जिल्ह्यात  सर्व पक्षांमध्ये प्रस्थापितांचा बोलबाला असेल. युतीच्या आमदारांनी मोठ्या प्रमाणात केलेली विकास कामे ही त्यांच्यासाठी जमेची बाजू असेल. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा, जम्मू-काश्मीरबाबत झालेला निर्णय युतीला बळ देणारा ठरेल.

ही बातमी पण वाचा : “मला तिकीट नाही तर किमान मुलाला किंवा बायकोला तरी द्या”, अशी…

सर्वाधिक उत्सुकता आहे ती बुलडाणामध्ये शिवसेनेचा तर चिखलीमध्ये भाजपचा उमेदवार कोण असेल या बाबत. चिखलीमध्ये श्वेता महाले, विजय कोठारी, सुरेशअप्पा खबुतरे अशी नावे भाजपकडून चर्चेत आहेत. बुलडाणामध्ये गेल्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले संजय गायकवाड हे आता शिवसेनेत असून उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जातात. गेल्यावेळी चौथ्या क्रमांकावर राहिले शिवसेनेचे माजी आमदार विजयराज शिंदे हेही उमेदवारीच्या शर्यतीत आहेत. गेल्या वेळी तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले भाजपचे योगेंद्र गोडे हे ही जागा भाजपने स्वतःकडे घ्यावी यासाठी आग्रही आहेत. खामगावमध्ये भाजपचे फुंडकर यांच्या विरोधात माजी आमदार दिलीप सानंदा एकमेव दावेदार आहेत.

गेल्यावेळी तिसऱ्या क्रमांकाची मते घेतलेले वंचित आघाडीचे अशोक सोनवणे पुन्हा एकदा वंचितचेच उमेदवार असतील असे मानले जाते. जळगाव जामोदमध्ये डॉक्टर कुठे यांच्या विरोधात काँग्रेसकडून डॉ. स्वाती वाकेकर, प्रसन्नजीत पाटील, रामविजय बुरुंगले हे दावेदार असतील. वंचित आघाडीचा उमेदवार भाजपला फायदेशीर ठरेल.

भाजप-शिवसेनेची परंपरागत व्होट बँक या जिल्ह्यात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोठे जाळे वर्षानुवर्षे या ठिकाणी दिसते. केंद्र आणि राज्यात भाजप सरकार असणे ही देखील जमेची बाजू आहे. सलगच्या पराभवामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी नाउमेद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर युतीचा पराभव करण्याचे मोठे आव्हान आघाडी पेलू शकेल असे तूर्त तरी दिसत नाही. त्यातच वंचित बहुजन आघाडीची डोकेदुखी काँग्रेस आघाडीला सतावणार आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सध्याचे पक्षीय बलाबल असे –
भाजप – 3 : डॉ. संजय कुटे, चैनसुख संचेती, आकाश फुंडकर. शिवसेना –  2 : संजय रामुलकर, डॉ. शशिकांत खेडेकर. काँग्रेस – 2 :  हर्षवर्धन सपकाळ, राहुल बोंद्रे.